पाच हजारांपेक्षा जास्तीचे वीज बिल भरायला आता ऑनलाइनच भरावे लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 04:16 PM2023-07-28T16:16:38+5:302023-07-28T16:17:55+5:30
रोखीने भरणा करण्यास निर्बंध; कमाल मर्यादेचा नियम लागू होणार
नागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना वीजबिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यावरील रकमेच्या वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असून, त्यानंतर कुठल्याही वीजग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाइन’ पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाइन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही करू शकतो. ही पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यायांद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे.
ऑनलाइनला प्राधान्य
ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २०७७च्या तरतुदी असल्याने पाच हजारांपेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्वीकारण्यात येऊ नये, अशा आशयाच्या सूचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढी यांना महावितरणकडून देण्यात येत असून, ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.