वीज कोसळून दोघांचा मृत्यू
By admin | Published: June 17, 2017 02:18 AM2017-06-17T02:18:46+5:302017-06-17T02:18:46+5:30
जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला
एक जखमी : गुमथळा, गोंडखैरी शिवारातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
गुमथळा/कळमेश्वर : जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. या घटना कामठी तालुक्यातील गुमथळा आणि कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी शिवारात अनुक्रमे गुरुवारी व शुक्रवारी दुपारी घडल्या.
पहिली घटना गुमथळा शिवारात गुरुवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. विनोद अजाब कोकाटे (३५, रा. बोरी-राणी, ता. पारशिवनी) यांनी गुमथळा शिवारातील त्यांचे सासरे नागोराव खेडकर, रा. गुमथळा व अन्य दोन शेतकऱ्यांची शेती ठेक्याने केली आहे. त्यामुळे ते गुरुवारी दुपारी शेताची ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते.
दरम्यान, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विनोद आणि नत्थूजी ठाकरे हे दोघेही शेतातील कडूनिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबले. त्यातच विनोदचा भाऊ अमोल कोकाटे व रूपचंद बोरकुटे दोघेही ट्रॅक्टर शेताच्या बाहेर नेत होते. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात विनोद व नत्थूजी ठाकरे गंभीर जखमी झाले. अमोल आणि रूपचंद या दोघांनीही विनोद व नत्थूला लगेच गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी विनोदला मृत घोषित केले तर नत्थूवर प्रथमोपचार करून मेयो रुग्णालयात रवाना केले.
दुसरी घटना कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी शिवारात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. धनराज नामदेव टापरे (४५, रा. गोंडखैरी, ता. कळमेश्वर) हे अरुण रंगराव अतकरी, रा. गोंडखैरी यांच्या शेतात कामाला गेले होते. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने ते शेतात झाडाचा आडोसा शोधत होते. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा व सोबतच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा व कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.