वीज कंपन्या दोन तास अतिदक्ष राहणार : महापारेषणने जारी केले दिशानिर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 09:16 PM2020-04-04T21:16:11+5:302020-04-04T21:17:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत. महापारेषणने यासंदर्भात दिशानिर्देश जारी करीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतची वेळ अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने यादरम्यान वीज उत्पादन व वितरण कंपन्यांना विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.
महापारेषणने स्पष्ट केले आहे की, ग्रीड फेल होऊ नये म्हणून हायड्रो प्रोजेक्टमधून पूर्ण क्षमतेने उत्पादन करावे लागेल. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कंपनीने मनपासह सर्व स्थानिक संस्थांना पथदिवे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक दिनेश वाघमारे यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आपापल्या घरातील लाईटशिवाय सर्व उपकरणेसुरू ठेवण्यास सांगितले आहे. रुग्णालयातील लाईट बंद न करण्याचेही आवाहन केले आहे. राज्यातील ग्रीडची फ्रिक्वेन्सी मेन्टेन ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने तयारी केली आहे. दोन तास सर्व वीज कंपन्या अतिदक्षता बाळगतील.
वीज बंद हाऊ देणार नाही : ऊर्जामंत्री राऊत
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा नागरिकांना लाईट बंद न करता दिवे जाळण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, अचानक विजेची मागणी कमी झाल्यास ग्रीड फेल होऊ शकतो. हवामान खराब झाल्याने ब्रेकडाऊन झाल्यास मागणीवर परिणाम पडतो. परंतु देशभरात पहिल्यांदाच एकाच वेळी सर्वजन वीज बंद केल्याने ग्रीडवर परिणाम पडू शकतो. राज्यातील वीज कंपन्यांचे अधिकारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत. कुठल्याही परिस्थितीत ग्रीड फेल होऊ देणार नाही. वीज बंद होऊ देणार नाही.