नागपुरातील वीज ग्राहकांना आता मिळणार ‘थर्मल पावती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 10:00 PM2019-09-18T22:00:35+5:302019-09-18T22:01:25+5:30
महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक व त्यांच्या खात्यावर वेळेत समायोजित व्हावा यासाठी महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून नागपूर शहरातील काँग्रेसनगर, महाल, बुटीबोरी, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या पाच विभागातील वीज ग्राहकांना बुधवारपासून या पद्धतीच्या पावत्या वितरित करण्यास सुरुवात झाली.
नागपूर शहरातील वरील पाच विभागासह राज्यातील आणखी २५ शहरी विभागांमध्ये या पद्धतीच्या पावत्या १६ सप्टेंबरपासून वितरित करण्यात येत आहेत. नागपूर शहरातील वीज ग्राहकांनी अशा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण आणि भांडुप परिमंडळातील ठाणे, वाशी, कल्याण-१ व २, वसई या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रातून छापील कागदाऐवजी थर्मल पेपरवर संगणकीकृत क्रमांकासह पावत्या छापून देण्यास १ एप्रिल २०१९ पासून सुरुवात करण्यात आली होती.
आता नागपूर शहरासह नाशिक , मालेगाव, औरंगाबाद , भुसावळ, जळगाव शहर, नांदेड, अकोला शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, सांगली शहर, भोसरी, कोथरूड, पिंपरी, पुण्यातील शिवाजीनगर, बंडगार्डन, नगर, पर्वती, पद्मावती, रास्तापेठ या २५ विभागांमध्ये वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना संगणकीकृत क्रमांक असणाऱ्या पावत्या थर्मल पेपरवर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्रमांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅप वीजबिल भरल्याची खात्री करता येईल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी व संगणकीकृत पावतीशिवाय वीजबिल भरू नये. तसेच फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.