वीज ग्राहकांनी स्वत:च पाठवावे मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:28+5:302021-04-25T04:07:28+5:30
नागपूर : कोविडचा संसर्ग वाढल्याने महावितरणची मीटर रीडिंग व बिल वितरणाची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. अशा वेळी कंपनीने ग्राहकांना ...
नागपूर : कोविडचा संसर्ग वाढल्याने महावितरणची मीटर रीडिंग व बिल वितरणाची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. अशा वेळी कंपनीने ग्राहकांना स्वत:च मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. याकरिता कंपनीने ग्राहकांना महिन्यात चार दिवस देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीनुसार हे काम अत्यावश्यक सेवेत असल्याने वीज वितरणाशी जुळलेल्या कार्याला परवानगी दिली आहे. मीटर रीडिंग घेणे आणि बिल वितरणाचीही परवानगी आहे, पण कोविड संसर्गामुळे शहरातील अनेक परिसर आणि सोसायट्यांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. अशा भागात मीटर रीडिंग घेणे शक्य नाही. अशा भागातील ग्राहकांना कंपनीने मोबाइल अॅप अथवा वेबसाइटच्या माध्यमातून मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे.
कंपनीने म्हटले आहे की, केंद्रीयकृत बिल प्रणाली सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात १ ते २५ तारखेदरम्यान लघुदाब वीज ग्राहकांकडून मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येते. या तारखेसोबत मीटर क्रमांक वीजबिलावर नमूद असतो. या तारखेच्या एक दिवसाआधी कंपनी एसएमएसच्या माध्यमातून रीडिंग पाठविण्याचा मॅसेज पाठविणार आहे. मॅसेज मिळाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ग्राहकांना आपल्या मीटरचे रीडिंग पाठवायचे आहे. अॅपच्या सबमिट मीटर ऑप्शनवर जाऊन ग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. स्वत: मीटर रीडिंग पाठविल्याने ग्राहकांना त्यांचे मीटर व रीडिंगकडे लक्ष राहील. बिल रीडिंगनुसार येत आहे वा नाही, याची खातरजमा ग्राहकांना करता येईल.