ऐन सणासुदीत कापली गंगा-जमुनातील वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:02+5:302021-09-10T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंगा-जमुना परिसरातून देहव्यापार पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. वारांगनांची टप्प्याटप्प्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगा-जमुना परिसरातून देहव्यापार पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. वारांगनांची टप्प्याटप्प्याने नाकाबंदी केली जात आहे. पोलिसांच्या निर्देशानुसार गुरुवारी या परिसरातील पाच घरांची वीज कापण्यात आली. या कारवाईमुळे गंगा-जमुनात खळबळ उडाली आहे. एकीकडे मानवाधिकारांचे हे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे कायद्यानुसार कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीतच केलेल्या कारवाईमुळे वारांगणांसाठी लढणाऱ्या संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
शहर पोलिसांनी गंगा-जमुना परिसरातून देहव्यापाराच्या अड्ड्याविरुद्ध विशेष अभियान छेडले आहे. देहव्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या घरांना अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (पीटा)अंतर्गत सील केले जात आहे. पाच घरांना सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. घरांना सील करण्यापूर्वी त्याचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा नियम आहे. याअंतर्गत पोलिसांनी महावितरणला पत्र लिहिले आणि त्यानंतर वीज कापण्याची कारवाई करण्यात आली.
- उच्च न्यायालयातूनही दिलासा नाही
दरम्यान, सील केलेल्या घरांचे मालक या कारवाईविरुद्ध उच्च न्यायालयातही गेले. त्यांनी पोलीस निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली. दोन याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने तांत्रिक कारणावरून त्या खारीज केल्या. त्यामुळे न्यायालयाकडूनही त्यांना कुठलाही दिलासा मिळू शकला नाही.