बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांना कमी दरात वीज
By admin | Published: October 4, 2016 06:18 AM2016-10-04T06:18:58+5:302016-10-04T06:18:58+5:30
रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु
नागपूर : रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु कालांतराने निजाम व ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शोषण आजवर सुरू आहे. गेल्या ६० वर्षात विदर्भातील सिंचन, वीज, खनिजे व औद्योगीकरणाचे आधार काढून विदर्भाला मागास ठेवण्यात आले आहे. परंतु स्वतंत्र विदर्भ राज्यात येथील बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांसाठी कमी दरात मुबलक वीज उपलब्ध केली जाईल.
नवीन सरकार विदर्भाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही प्रतिरूप राज्यपाल डॉ. मधुकर निसळ यांनी आपल्या अभिभाषणातून दिली. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित विदर्भ राज्याच्या दुसऱ्या प्रतिरूप विधानसभेच्या कामकाजाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात करण्यात आली. प्रदूषणामुळे होणारे शेतीचे नुकसान, पशुधनाची आबाळ तसेच मानवी आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता सरक ारचा पर्यावरण संवर्धनावर भर राहणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे घडणाऱ्या आत्महत्या ही भीषण समस्या आहे. त्यामुळे सरकार कर्जमुक्तीचे धोरण स्वीक ारणार आहे. सोबतच उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमालाला किफायतशीर भाव, कृषी उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही मधुकर निसळ यांनी दिली.
शासनाच्या अधीन असलेल्या नोकऱ्यांत यापुढे विदर्भातील बेरोजगारांनाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आजवर अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. विदर्भात निर्माण होणाऱ्या विजेपैकी एक तृतीयांश वीज येथील जनतेला मिळत होती. आता कमी खर्चात मागणीनुसार वीज उपलब्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे विदर्भातील उद्योगाला चालना मिळणार आहे. उद्योगासाठी नवीन पॅकेज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)