फडणवीस सरकारच्या बचतीमुळेच वीज दर कपात : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:47 PM2020-04-01T19:47:49+5:302020-04-01T20:22:41+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वीज दर कमी करण्याबाबतची ही याचिका आयोगाकडे भाजपा सरकारच्या काळातच दाखल करण्यात आली होती आणि २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन करून आयोगाने हा निर्णय दिला आहे, असे सांगताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, वीज कमी दरात खरेदी करता यावी, यासाठी महावितरणने गेल्या ५ वर्षांत अनेक व्यवस्था उभ्या केल्या. आयोगाने आपल्या आदेशात ज्याचा उल्लेख केला त्यात, ‘मेरिट ऑर्डर डिसपॅच’ यंत्रणेचा अवलंब केल्यामुळे महागड्या वीज खरेदीला पायबंद घालण्यात आला. एकूण खर्चात ८० टक्के वाटा हा वीजखरेदीचा असल्याने ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. गेल्या ५ वर्षांत अनेक उपाय करण्यात आले. त्यात विनिमय दर अधिक असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर भर, सौर उर्जेच्या क्षेत्रात करण्यात आलेली लक्षणीय वाढ, त्याची औष्णिक वीजेपेक्षा कमी किंमत, हाऊसिंग सोसायटींमध्ये सोलर उपकरणांचा आग्रह केल्यामुळे सुद्धा मोठा लाभ झाला. यामुळे प्रतियुनिट विजेचा दर कमी करण्यात यश आले. चारही विभागांमध्ये यंत्रणेचे विकेंद्रीकरण करण्यात आले.
प्रत्येक बाबतीत स्पर्धात्मक निविदेचा आग्रह धरण्यात आल्याने यातून सुमारे २४ हजार कोटींची बचत झाली. भांडवली खर्च कमी करता आले. ‘रिटर्न ऑन इक्विटी’ ही १५ टक्क्यांऐवजी केवळ ७.५ टक्के राहिली, यातून सुमारे ९५०० कोटींची बचत झाली. एजी कन्झम्पशनच्या माध्यमातून वार्षिक १००० कोटींची बचत झाली.
या सर्वांचा परिणाम असा झाला की, खर्चात कपात आणि निरनिराळ्या माध्यमातून बचत केल्याने इतिहासात प्रथमच महावितरण कंपनीला २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा उत्पन्न झाले आणि कंपनीने आयकराचा भरणा केला. २०१८-१९ मध्ये केंद्रीकृत पद्धतीने आयटी बिलिंग सुरू करण्यात आले. यामुळे महसुलात वाढ करणे शक्य झाले. या सर्व आधारावरच आयोगाने वीज दर कमी करण्याचा आदेश दिला, याचे आपण स्वागत करतो आणि वेळोवेळी केलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्या काळात माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.