खापरखेड्यात विजेचे रेकॉर्ड उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:58 PM2019-06-19T22:58:15+5:302019-06-19T23:00:46+5:30
महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न थांबता अखंडित विजेचे उत्पादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न थांबता अखंडित विजेचे उत्पादन केले.
महाजेनकोच्या चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ औष्णिक वीज केंद्रात ५०० मेगावॅट क्षमतेचे एकूण ८ युनिट कार्यरत आहेत. यात चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक -७ ने १७२.५ दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला होता. २७.५ दिवसापूर्वीच खापरखेडाच्या युनिट क्रमांक ५ ने हा रेकॉर्ड तोडला होता. आता काल मंगळवारी युनिट क्रमांक ५ ने सलग २०० दिवस उत्पादन करण्याचा नवीन रेकॉर्ड नोंदवला आहे. वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी सांगितले की, युनिट अजूनही आपल्या क्षमतेच्या ९० टक्के विजेचे उत्पादन करीत आहे.
आता २५० दिवसाचे लक्ष्य
महाजेनकोचे प्रबंध निदेशक अरविंद सिंह, संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी युनिटचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ही युनिट सलग २५० दिवस उत्पादन करण्याचा रेकॉर्डही करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत आणि त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन केले आहे.
ऊर्जामंत्र्यांनी दिले अभियंते-कर्मचाऱ्यांना श्रेय
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व खापरखेडा केंद्राचे अभियंता व कर्मचाऱ्यांना दिले आहे. ते म्हणाले , या श्रेयामुळे कर्मचाऱ्यांचे परिश्रम दिसून येतात. यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांचेच अभिनंदन करीत असेच यश पुढेही मिळत राहील. २५० दिवस सातत्याने उत्पादनाचे लक्ष्यही गाठता येईल, असा विश्वासही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.