वीज बचत करणारे कृषीपंप देणार
By Admin | Published: December 26, 2015 03:41 AM2015-12-26T03:41:37+5:302015-12-26T03:41:37+5:30
सध्याचे कृषी पंप मोठ्या प्रमाणात वीज खातात. ५ हॉर्स पॉवरच्या कृषी पंपाला प्रत्यक्षात ७ हॉर्स पॉवर एवढी वीज लागते.
ऊर्जामंत्र्यांची माहिती : ५० टक्के विजेची बचत, बिलही अर्धे होणार
नागपूर : सध्याचे कृषी पंप मोठ्या प्रमाणात वीज खातात. ५ हॉर्स पॉवरच्या कृषी पंपाला प्रत्यक्षात ७ हॉर्स पॉवर एवढी वीज लागते. यामुळे जास्त वीज खर्च होते व शेतकऱ्यांनाही बिल जास्त येते. यावर उपाय म्हणून येत्या काळात शेतकऱ्यांना वीज बचत करणारे कृषीपंप देण्याची योजना राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने आखली आहे. संबंधित पंप लावण्यास अडीच हॉर्सपॉवरसाठी लागणाऱ्या विजेत ५ हॉर्स पॉवरचा पंप चालेल. यामुळे जवळपास ५० टक्के विजेची बचत होईल व शेतकऱ्यांवरील बिलाचे ओझेही हलके होईल.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत या संबंधीची योजना ऊर्जा विभागाने तयार केली असल्याचे सांगितले. बावनकुळे म्हणाले, संबंधित ऊर्जा बचत करणाऱ्या कृषी पंपाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. राज्यात ४० लाख शेतकऱ्यांनाकडे वीज कनेक्शन आहे. या शेतकऱ्यांना ऊर्जा मंत्रालयातर्फे संबंधित कृषी पंप दिल्यास १६ हजार कोटी रुपये खर्च येईल. सध्या कृषी क्षेत्रासाठी अडीच हजार मेगावॅट वीज लागते. वीज बचत करणारे कृषी पंप लावल्यास हा वापर एक ते सव्वा हजार मेगा वॅटवर येईल. बचत होणाऱ्या विजेमुळे सबसिडीवरील भार कमी होईल. शिवाय ही वीज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देता येईल. शेतकऱ्यांकडे वीज बिलापोटी १२ हजार कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बचत करणारे कृषी पंप विनाशुल्क देण्याचा विचार सुरू आहे. नियमित बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाही याचा फायदा दिला जाईल. या संबंधीचे निकष, नियम लवकरच तयार केले जाईल. मार्चच्या अधिवेशनात ही योजना जाहीर करण्याचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना प्री-पेड मीटर
राज्यातील १५ लाख शेतकऱ्यांकडे वीज मीटर नाही. या शेतकऱ्यांना प्री-पेड वीज मीटर दिले जाईल. मोबाईलच्या रिचार्ज व्हाऊचर प्रमाणे शेतकऱ्यांना विजेचे कार्ड खरेदी करावे लागेल. जेवढ्या रकमेचे कार्ड खरेदी केले तेवढी वीज शेतकऱ्याला वापरता येईल. शेतकऱ्यांनी ही वीज सवलतीच्या दरात म्हणजे ८५ पैसे प्रति युनिटप्रमाणेच मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची ट्रान्सफार्मर समिती
पाणी वाटप संस्थांप्रमाणे शेतकऱ्यांची ट्रान्सफार्मर समिती स्थापन केली जाईल. एका ट्रान्सफार्मरवरून जेवढ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन असेल तेवढे शेतकरी या समितीचे सदस्य असतील. संबंधित शेतकऱ्यांनाच ट्रान्सफार्मरवर लक्ष ठेवावे लागेल. यामुळे हूक टाकून होणारी वीजचोरी व अतिरिक्त भार आल्यामुळे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार रोखता येतील. या माध्यमातून होणाऱ्या वीज बचतीचा संबंधित समित्यांना फायदा दिला जाईल.
रात्रीची वीज स्वस्त करणार
राज्याच्या मागणीनुसार दिवसा १४ ते १५ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. मात्र, रात्री दोन हजार मेगावॅट वीज अतिरिक्त आहे. रात्रीची वीज वापरण्यास तयार असणाऱ्या विदर्भ- मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज देण्याची योजना असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.