२७ सप्टेंबरपासून हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:56+5:302021-09-22T04:08:56+5:30
नागपूर : हत्तीरोग मोहिमेसाठी आवश्यक असणारे संक्रमण पडताळणी सर्वेक्षण २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार ...
नागपूर : हत्तीरोग मोहिमेसाठी आवश्यक असणारे संक्रमण पडताळणी सर्वेक्षण २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी ३० चमू नेमण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिली.
भारत सरकारच्या मानकानुसार नागपूर जिल्हा हत्तीरोगप्रवण भागात मोडतो. त्यामुळे जिल्ह्यात २००४ सालापासून वेळोवेळी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात आली. मागील ३ वर्षांपासून सतत १ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. २०२०मध्ये या मोहिमेचे मूल्यमापन कोरोनामुळे होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता २७ सप्टेंबरपासून संक्रमण पडताळणी सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम राबविण्यासाठी शहराचे दोन विभाग व नागपूर ग्रामीणचे दोन विभाग बनविण्यात आले आहेत. प्रत्येक चमूमध्ये ७ ते ८ कर्मचारी असतील. रक्त नमुना देणाऱ्या मुलांच्या पालकांनी मोहीम राबविण्यात पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
डब्ल्यूएचओने दिल्या ८ हजार किट्स
या मोहिमेत जिल्ह्याच्या सुमारे ५२ लाख २३ हजार लोकसंख्येतून शासकीय निकषांनुसार निवडलेल्या गावातील ६ ते ७ वर्षांच्या मुलांचे रक्त फायलेरिया टेस्ट स्ट्रिपव्दारे तपासण्यात येणार आहे. यामध्ये रक्त नमुना घेतल्यानंतर सुमारे १० मिनिटात तो दूषित आहे किंवा नाही, हे कळेल. या मोहिमेसाठी जागतिक आरोग्य संस्थेने ८ हजार किट्स जिल्ह्याकरिता उपलब्ध करून दिली आहेत.