विदर्भात विजांचा वज्रघात; ठिकठिकाणी १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 10:41 AM2022-06-24T10:41:24+5:302022-06-24T10:52:13+5:30

एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Eleven farmers in Vidarbha died due to lightning strike | विदर्भात विजांचा वज्रघात; ठिकठिकाणी १२ जणांचा मृत्यू

विदर्भात विजांचा वज्रघात; ठिकठिकाणी १२ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर, गाेंदिया, बुलडाणा, गडचिराेली, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत कडकडाट

नागपूर : विदर्भावर विजेचे संकट घाेंगावतच आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पडून मृत्यू हाेणाऱ्यांचे सत्र सुरू असून गुरुवारीही हे सत्र कायम हाेते. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाेबतच गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यातही वीज काेसळली.

पवनकुमार मनोहर गुढेवार (२७, रा. सावरटाेला, ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया), जोशीराम झगडू उईके (४५, बाेळुंदा, ता. गाेरेगाव, जि. गाेंदिया), रामेश्वर ठाकरे (५२, रा. घोटी, ता. गाेरेगाव, जि. गाेंदिया), वंदना अनिल वरठी (३२, रा. नवीन देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर), प्रफुल्ल दीपक नाईक (२६, रा. रा. बजाज नगर वाघोडा, ता. सावनेर, जि. नागपूर, संजय उत्तम मारोडे (५५) व रवी संजय भालतडक (३५) दाेघेही रा. पळशी झांशी जि. बुलडाणा, रामाया मोंडी सल्लावार (६०, रा. कोडसेलगुडम , ता. अहेरी, जि. गडचिराेली), सोनाली किशोर वाघमारे (२६, रा. विसलाेण, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर), राेशनी नरेश मंडवे (२१, रा. बुधवारा, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), आयुष राजेश इंगळकर (१४, रा. देवगाव, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.

निंबा (ता. पारशिवनी, जि. नागपूर) येथील नागेश्वराव रावीपाठी यांच्या शेतात मजुरीचे काम सुरू हाेते. अचानक दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास वीज काेसळली. त्यात वंंदना अनिल वरठी, रोशनी वरठी (१८, रा. देवलापार) या दाेघी गंभीररीत्या भाजल्या. त्यांना लगेच पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथून नागपूरच्या मेयाेमध्ये नेत असताना वंदना यांचा मृत्यू झाला. तर राेशनी यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत वंदना यांना वैष्णवी (१०) आणि माेहित (२) अशी दाेन मुले आहे.

गाेंदिया जिल्ह्यातील पहिल्या घटनेत घरामागे असलेल्या शेतात काम करीत असताना वीज पडल्याने सावरटोला येथील पवनकुमार मनोहर गुढेवार या २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. दुसरी घटना गाेरेगाव तालुक्यातील बोळुंदा येथे गुरुवारी (दि.२३) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यात शेतात पेरणीचे काम करीत असलेल्या जोशीराम झगडू उईके (४५) यांचा मृत्यू झाला. गाेंदिया जिल्ह्यात तिसरी घटना घोटी जानाटोला (ता. गाेरेगाव) येथे घडली. तेथील दीनदयाल पटले यांच्या शेतात तीन शेतमजूर काम करीत असताना वीज काेसळली. त्यात रामेश्वर ठाकरे यांचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर रामप्रसाद बिसेन रा. जानाटोला व झामाजी कुर्वे वय झांजिया हे जखमी झाले आहेत. त्यांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात दुसरी घटना चनकापूर (ता. सावनेर) येथे घडली. प्रफुल्ल नाईक आणि त्याचा मित्र शिवप्रकाश बाबुला कैथल हे दाेघेही चनकापूर रिजनल वर्कशाॅपच्या बाजूला एका झाडाखाली बसले हाेते. दरम्यान १२.४५ वाजताच्या सुमारास वीज काेसळली. त्यात प्रफुल्लचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शिवप्रकाश गंभीर जखमी असून वेकाेलिच्या वलनी हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अहेरी (जि. गडचिराेली) तालुक्यातील कमलापूरजवळच्या कोडसेलगुडम या गावातील रहिवासी रामाया मोंडी सल्लावार (वय ६०) हे गुरुवारी शेतात काम करीत असताना वीज पडून ते जखमी झाले. त्यांना ताबडतोब कमलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रामाया यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

भद्रावती (जि. चंद्रपूर) तालुक्यातील विसलोण येथे शेतात मजुरीसाठी गेलेल्या सोनाली वाघमारे या महिलेचा सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला. तर काही अंतरावर मागे असणाऱ्या सिंधूबाई उद्धव कुतरमारे (६०) ही महिला जखमी असून चंद्रपूर येथे दवाखान्यात हलविले आहे. तर निकिता रमेश कोरडे ही महिला किरकोळ जखमी आहे. सोनालीच्या मागे ५ वर्षाचा मुलगा आणि ७ वर्षाची मुलगी आहे. पतीही मजुरीची कामे करतात.

धावत्या दुचाकीवरील महिला ठार

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील कोकर्डा-तामसवाडी फाट्याजवळ वीज कोसळल्याने दुचाकीवरील तिघे गंभीररीत्या भाजले. या तिघांपैकी महिला दगावली, तर तिचा पती व बहीण गंभीर जखमी आहेत. रोशनी नरेश मंडवे (२१, रा. बुधवारा, सुर्जी) असे मृताचे नाव आहे. अंजनगाव सुर्जी येथून म्हैसांगकरिता दर्यापूर मार्गाने नरेश मंडवे (२४) हे दुचाकीवर पत्नी रोशनी व तिची बहीण रेश्मा आनंद इंगळे (१९) हिला घेऊन निघाले होते. अचानक वीज त्यांच्या दुचाकीवर झेपावली. ती थेट रोशनीला स्पर्शून गेली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. नरेश व रेश्मा यांना दर्यापुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

वीज पडून विद्यार्थी ठार

धामणगाव रेल्वे (अमरावती) : शेतात कपाशी टोपण्याकरिता गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्यावर वीज काेसळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेत १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना देवगाव परिसरात दुपारी घडली. आयुष राजेश इंगळकर (१४) असे मृताचे तर उमेश सुधाकर चौधरी (१६) असे जखमी मुलाचे नाव आहे. दोघेही गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात कपाशीची टोपणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान वीज अंगावर कोसळल्याने आयुषचा मृत्यू झाला. तो देवगाव येथील शाळेत तो इयत्ता सातवीत शिकत होता. उमेशने नुकतेची दहावी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण केली. तो गंभीर भाजला गेल्याने सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तळेगाव दशासरचे पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांनी दिली.

क्रेनवर काम सुरू असताना पडली वीज; दाेघे ठार

बुलडाणा जिल्ह्यातील पळशी झांशी गाव शिवारात शुभम हेलगे यांच्या शेतात विहिरीचे क्रेनद्वारे खोदकाम सुरू होते. यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू असताना क्रेनवर काम करणारे संजय उत्तम मारोडे (वय ५५) व रवी संजय भालतडक ( वय ३५) या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पावसामुळे आपले अंगावरील कपडे ओले होऊ नये याकरिता कपडे आणण्याकरिता गेलेले मंगेश मनोहर बाखरे व बंडू मधुकर मारोडे जखमी झाले. जखमींना गावातील लोकांनी संग्रामपूर येथील दवाखान्यात दाखल केले.

Web Title: Eleven farmers in Vidarbha died due to lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.