शहरातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय समितीच्या प्रक्रियेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:12+5:302021-08-14T04:11:12+5:30
नागपूर : राज्य सरकार अकरावीच्या प्रवेशासाठी घेणार असलेली सीईटीची परीक्षा न्यायालयाने रद्द केली. ६ आठवड्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ...
नागपूर : राज्य सरकार अकरावीच्या प्रवेशासाठी घेणार असलेली सीईटीची परीक्षा न्यायालयाने रद्द केली. ६ आठवड्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया दोन पद्धतीने होतात. महापालिकेच्या हद्दीतील ज्युनिअर कॉलेजमध्ये केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून प्रवेश घेतले जातात. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केंद्रीय समितीच्या प्रक्रियेची प्रतीक्षा आहे, तर ग्रामीण भागात प्रवेश सुरू झाले आहेत.
नागपूरच नाही तर राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व मुंबईच्या एमएमआरडीए येथे परीक्षा केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून घेण्यात येते. केंद्रीय प्रवेश समितीने विद्यार्थ्यांच्या अर्जाची नोंदणी ९ ऑगस्टपासून सुरू केली आहे. २७ ऑगस्ट रोजी अकरावीच्या पहिल्या फेरीचे प्रवेश सुरू होणार आहेत. पण, ग्रामीण भागातील प्रवेशाला समितीचा अडसर नसल्याने काही कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कॉलेज १६ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करणार आहेत. त्यामुळे शहरातील ज्युनिअर कॉलेजला विद्यार्थी मिळणार की नाही, अशी भीती ज्युनिअर कॉलेजला भेडसावत आहे. शहरातील २३७ ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या ५९,२५० जागा आहेत. गेल्यावर्षी २४,४१६ जागा रिक्त राहिल्या होत्या.
- दृष्टिक्षेपात
शहरातील अकरावीच्या एकूण जागा - ५९,२५०
विज्ञान शाखेतील जागा - २७,४६०
वाणिज्य शाखेतील जागा - १८,०००
कला शाखेतील जागा - ९,६६०
----------
दहावीत जिल्ह्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ५९,८४७
प्राविण्य प्राप्त - २१,६३५
प्रथम श्रेणी मिळालेले - २१,८६९
द्वितीय श्रेणी मिळविलेले - ९,०९६
- शहरातील प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून राबविली जाते. समितीच्या माध्यमातून गुणवत्तानिहाय विद्यार्थ्यांची यादी कॉलेजला पाठविली जाते. त्यानुसार आम्हाला प्रवेश देणे बंधनकारक आहे.
कबीर रावळेकर, उपप्राचार्य, डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी
- ग्रामीण भागातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया काही ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू झाली आहे. काही ज्युनिअर कॉलेज सीईटीची वाट बघत होती. परंतु सीईटी रद्द झाल्याने १५ ऑगस्टनंतर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करतील. विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या अर्जानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
मिलिंद वानखेडे, प्राचार्य, प्रकाश हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज