अकरावीची सीईटी २१ ऑगस्ट रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:53+5:302021-07-21T04:07:53+5:30
नागपूर : अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) होणार आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ही परीक्षा ...
नागपूर : अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) होणार आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ही परीक्षा होईल. परीक्षेचे आयोजन राज्य शिक्षण मंडळ करणार आहे. परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यार्थी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. बोर्ड आपल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची फी आकारणार नाही. तर सीबीएसई व सीआयएससीई बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या रूपात १७८ रुपये आकारणार आहे. पण ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. पण सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्रथम स्थान मिळणार आहे. परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येईल. १०० गुणांची परीक्षा होईल. यात इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयाचे २५ गुण राहील. सात भाषेत परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना कुठल्याही एका भाषेची निवड करायची आहे. परीक्षेचा वेळ तीन तासाचा राहील. परीक्षा बोर्डाने ठरवून दिलेल्या केंद्रावर होईल.
- अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील
बोर्डाने २१ ऑगस्टला सीईटीचे आयोजन केले आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. कारण सीईटीचा निकाल सप्टेंबर महिन्यात घोषित होईल. त्यानंतर केंद्रीय प्रवेश समितीकडून प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होईल. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान १० दिवसाचा कालावधी देण्यात येईल. पहिल्या फेरीतील प्रवेश होण्यासाठी किमान आठवडाभराचा वेळ लागेल. तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होईल.