दारू दुकान बंदीसाठी एल्गार
By admin | Published: April 25, 2017 01:58 AM2017-04-25T01:58:34+5:302017-04-25T01:58:34+5:30
गोरले लेआऊट येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी परिसरातील महिलांनी आंदोलन पुकारले आहे.
गोरले लेआऊट येथील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नागपूर : गोरले लेआऊट येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी परिसरातील महिलांनी आंदोलन पुकारले आहे. या महिलांनी राज्य मार्गापासून दारूच्या दुकानाची मोजणी केली असता, त्यात या दुकानाचे अंतर ५०० मीटरच्या आत आढळल्याने, नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी गोरले लेआऊटच्या महिला नगरसेवक संदीप जोशी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडकल्या.
महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दारू दुकानापासून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. राज्यमार्गापासून दारूच्या दुकानाचे अंतरही ५०० मीटरच्या आत असल्याचे महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
महिलांच्या सांगण्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना या जागेवर दारू दुकानाची पाहणी करण्याकरिता पाठविले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, दारूचे दुकान राज्यमार्गापासून ५०० मीटरच्या आत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीने कारवाई करण्यात येऊन २४ तासाच्या आत दारू दुकान बंद करण्यात येईल, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या महिलांना दिले. यावेळी नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, मीनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)