अधिकाऱ्याच्या विरोधात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याचा एल्गार
By नरेश डोंगरे | Published: September 11, 2023 03:27 PM2023-09-11T15:27:56+5:302023-09-11T15:28:13+5:30
सोमवारपासून या उपोषणाला सुरुवात
नागपूर : विभागीय नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करून एसटीच्या एका महिला कर्मचाऱ्याने आजपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावरून विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकारी विरुद्ध महिला कर्मचारी असा वाद पेटला होता. त्या वादाला शमविण्यात कुणालाच यश न आल्यामुळे आता या वादाने भडका घेतल्याचे बोलले जाते.
या संबंधाने एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्याने विभागीय नियंत्रक कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यासंबंधाने चोकशी आणि पाठपुरावाही झाला. मात्र, योग्य निवाडा झाला नाही उलट अधिकाऱ्याकडून जास्तच त्रास दिला जात असल्याची भावना झाल्यामुळे या कर्मचारी महिलेने उपोषणाचे अस्त्र उगारण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यानुसार सोमवारपासून या उपोषणाला सुरुवात झाली आहे.