कुणबी समाजाचा एल्गार, रविवारपासून आंदोलनाची हाक; संविधान चौकात बेमुदत धरणे

By कमलेश वानखेडे | Published: September 8, 2023 09:02 PM2023-09-08T21:02:30+5:302023-09-08T21:02:53+5:30

नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधात कुणबी समाजाने एल्गार पुकारला आहे. सर्वशाखीय कुणबी समाजाची शुक्रवारी बैठक ...

Elgar of Kunbi community, call for agitation from Sunday; | कुणबी समाजाचा एल्गार, रविवारपासून आंदोलनाची हाक; संविधान चौकात बेमुदत धरणे

कुणबी समाजाचा एल्गार, रविवारपासून आंदोलनाची हाक; संविधान चौकात बेमुदत धरणे

googlenewsNext

नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधात कुणबी समाजाने एल्गार पुकारला आहे. सर्वशाखीय कुणबी समाजाची शुक्रवारी बैठक झाली. त्यात रविवारपासून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. नागपुरातील संविधान चौकात सकाळी ११ वाजतापासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली जाणार आहे.

अखिल कुणबी समाज, विठ्ठल-रुखमाई मंदिर, नवाबपुरा, जुनी शुक्रवारी रोड, नागपूर येथे सर्वशाखीय कुणबी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत समाज संघटनांच्या प्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्षांतील कुणबी नेते उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये सहभागी करण्यास कडाडून विरोध करण्यात आला. सरकारने असे कुठलेही पाऊल उचलले तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सरकारकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

‘सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य’ या बॅनरखाली हे आंदोलन केले जाईल. आंदोलनासाठी समाजातील ज्येष्ठ नेते व मान्यवरांची मार्गदर्शक समिती स्थापन केली जाईल. तर कृती समिती स्थापन करून आंदोलनाचे संचलन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आंदोलनकाळात समाजातील लोकवस्ती, मोहल्ला, तालुका, गावात जाऊन जनजागरण करतील. यानंतर पुढील परिस्थिती पाहून जिल्हा पातळीवर भव्य मोर्चा काढला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात ही चळवळ नेऊन विदर्भ स्तरावर या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

अशा आहेत प्रमुख मागण्या...

- सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.
- परराज्यातील लोकांना कुठल्याही कागदपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये.
- मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये.
- ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावे.
- केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी.

समाज प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग

- बैठकीला सर्वशाखीय कुणबी समाज संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला डॉ. बबनराव तायवाडे, पुरुषोत्तम शहाणे, नरेश बरडे, राजेश काकडे, राजेंद्र काळमेघ, जानराव पाटील केदार, सुरेश गुडधे पाटील, सुरेश वर्षे, रमेश चोपडे, अरुण वराडे, सुरेश कोंगे, सुषमा भड, एकनाथ काळमेघ, बाबा तुमसरे, प्रदीप वादाफळे, मिलिंद राऊत, प्रकाश वसू, दीपक कापसे, अजय बोढारे, चंद्रशेखर कोल्हे, राजेंद्र कोरडे, परमेश्वर राऊत, वृंदा ठाकरे, हरिश्चंद्र बोंडे उपस्थित होते. बैठकीचे संचालन अवंतिका लेकुरवाळे यांनी केले.

आम्ही आधी कुणबी, नंतर पक्षाचे नेते

- या बैठकीला सर्वच पक्षांतील कुणबी नेते उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी आपण आधी कुणबी समाजाचे प्रतिनिधी आहोत, नंतर कुठल्या पक्षाचे पदाधिकारी, अशी भूमिका मांडली. बैठकीत काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार, माजी आ. अशोक धवड, काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आ. दीनानाथ पडोळे, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुधाकर कोहळे, माजी आ. डॉ. परिणय फुके, भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे आदींनी आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा शब्द दिला.

Web Title: Elgar of Kunbi community, call for agitation from Sunday;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.