विदर्भवाद्यांचा एल्गार, स्वतंत्र राज्यासाठी उद्यापासून नागपूर अन् बुलडाण्यात आमरण उपोषण
By नरेश डोंगरे | Published: December 25, 2023 10:55 PM2023-12-25T22:55:09+5:302023-12-25T22:55:18+5:30
शेंडी तुटो की पारंबी, विदर्भ राज्यासाठी गावोगावी होणार 'रस्ता रोको'
नागपूर : मुबलक नैसर्गिक साधन सुविधां असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवादामुळे विदर्भ ओसाड झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून बुधवारी २७ डिसेंबरपासून नागपूर तसेच बुलडाणा येथे आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासोबतच आत्मक्लेश आंदोलनही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे कोर कमिटी सदस्य प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, रंजना मामर्डे, ॲड. मृणाल मोरे, अशोक पाटील, सुनीता येरणे, राजेंद्र सतई आदी उपस्थित होते.
विदर्भात वीज, पाणी, कोळसा, अशी मुबलक नैसर्गिक साधने असतानादेखील राजकारण्यांमुळे विदर्भाचा मागासलेपणा संपता संपत नाही. नापिकी, आर्थिक कोंडीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आहे. मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला- माता आणि बालके कुपोषणामुळे मरत आहेत. रोजगार नसल्याने बेरोजगारांची गावोगावी फाैज निर्माण झाली आहे. विदर्भात दरवर्षी अधिवेशन होते मात्र जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर, समस्यांवर चर्चाच होत नाही.
विदर्भाला सुजलाम्, सुफलाम् बनवायचे असेल, तर ३१ डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा अशी, अशी मागणी आम्ही केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही नागपूरच्या संविधान चाैकात २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहोत, या आंदोलनाला विदर्भातील गावागावांतून नागरिकांचे समर्थन मिळत आहे. त्याचमुळे ईकडे आंदोलन आणि तिकडे गावोगावी रास्ता रोको केला जाणार आहे. हे आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही. शेंडी तुटो की पारंबी, अशी आमची भूमीका असल्याचेही ॲड. चटप यांनी सांगतिले.
बुलडाण्यातील जनताही आग्रही
नागपूरला २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण केले जाणार असल्याचे माहिती झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील समितीच्या सदस्यांनीही आम्हाला तिकडे आमरण उपोषण करण्याचा आग्रह धरून परवानगी मागितली. तिकडच्या जिल्ह्यातील जनतेला नागपूरात येऊन उपोषणाला बसणे शक्य होत नसल्याचे ध्यानात घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने त्यांना परवानगी दिली. त्यानुसार, २७ डिसेंबरपासून नागपुरात ॲड. चटप, पत्रकार प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर आणि वीरेंद्र जयस्वाल तर, बुलडाण्यात ॲड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंढे, प्रा. राम बारोटे, विलास फाटे, प्रकाश अवसरमोल आणि रविकांत आढाव हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.