‘चीनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवार करणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 07:06 PM2019-08-23T19:06:43+5:302019-08-23T19:08:41+5:30

घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात ‘चायनीज’ वस्तूंविरोधात मोहिम राबविण्यात येणार आहे.

Elgar of Sangh Parivar against 'Chinese dragon' | ‘चीनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवार करणार एल्गार

‘चीनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवार करणार एल्गार

Next
ठळक मुद्देदेशभरात ‘चायनीज’ वस्तूंचा विरोध करणार : स्वदेशी जागरण मंचचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये चीननेदेखील पाकिस्तानचीच री ओढली. भारतातील अंतर्गत मुद्द्यांमध्ये चीनकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न होत असताना संघ परिवाराने आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात ‘चायनीज’ वस्तूंविरोधात मोहिम राबविण्यात येणार आहे.
स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भुमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. स्वस्त दरात विक्रीच्या नावाखाली चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. याचा फटका देशातील अनेक लहान उद्योगांना बसला तर अनेक पारंपारिक उद्योग अक्षरश: डबघाईस आले.
आता भारत-पाक संबंध ताणले गेले असताना जगातील बहुतांश देश भारताच्या बाजूने आहेत. परंतु चीनकडून पाकिस्तानचीच बाजू घेण्यात येत आहे. सणासुदीच्या तोंडावर ‘चायनिज’ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे चीनला आर्थिक दणका देण्यासाठी स्वदेशी जागरण मंचातर्फे देशपातळीवर ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहसंयोजक डॉ.अश्वनी महाजन यांनी दिली.
‘डोकलाम’च्या वेळी झाला होता प्रयोग
२०१७ साली डोकलामच्या मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारताने कठोर भुमिका घेतल्यामुळे चीनकडून वेगवेगळ््या माध्यमातून धमकी देण्यात आली. चीन देशासाठी धोकादायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघ परिवाराने चीनला आर्थिक दणका देण्यासाठी पावले उचलण्याचा संकल्प केला व याअंतर्गतच ‘चायनिज’ वस्तूंविरोधात देशपातळीवर मोहिम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेला जनमानसातून समर्थन मिळाले होते.
गृहसंपर्कावर राहणार भर
स्वदेशी जागरण मंचतर्फे या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. ‘चायनीज’ वस्तूंचा वापर नागरिकांनी शक्य तितका थांबवावा, यासाठी स्थानिक पातळीपासून मोहिम राबविण्यात येणार आहे. यात ‘सोशल मिडीया‘चीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

Web Title: Elgar of Sangh Parivar against 'Chinese dragon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.