नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:33 PM2020-01-06T20:33:51+5:302020-01-06T20:59:39+5:30

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनपीआर) याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. सोमवारी नागपुरातील महिलांनीही या कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला.

Elgar of Women against CAA-NRC in Nagpur | नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिलांचा एल्गार

नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिलांचा एल्गार

googlenewsNext
ठळक मुद्देसंविधान चौकात भव्य आंदोलन : कायदा रद्द होत नाही तोवर लढण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनपीआर) याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. सोमवारी नागपुरातील महिलांनीही या कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला. हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. जोवर हा कायदा रद्द होत नाही, तोपवर लढण्याचा संकल्प केला. संविधान चौकात करण्यात आलेल्या या एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांसह पुरुषही सहभागी झाले होते.


नागपुरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन सामुहिक नेतृत्वात ‘आम्ही भारताचे लोक’ या बॅनर अंतर्गत हे आंदोलन केले. हा कायदा देशाच्या प्रत्येक नागरिकाविरुद्ध आहे. संविधानाविरुद्ध आहे. देशातील समता, स्वातंत्र्य व बंधुता नष्ट करणारा आहे. तेव्हा हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार नरेबाजीही करण्यात आली. याप्रसंगी अनेक महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करीत हा कायदा कसा देशविघातच आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. संविधानाच्या प्रास्ताविक वाचन करून आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी क्रांतिकारी गीतेही सादर करण्यात आली. 

आंदोलनात छाया खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, संध्या राजूरकर, वंदना जीवने, उषा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे, सांची जीवने, रेखा बारहाते यांच्यासह संजीवनी सखी मंच, बौद्ध रंगभूमी, द रिपब्लिकन, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन महिला ट्रस्ट, संबुद्ध महिला संघटना, समता सैनिक दल, दीक्षाभूमी धम्म महिला समिती, अ.भा. सत्यशोधक महिला, संबोधिनी महिला संघटना, आदिम संविधान संरक्षण समिती, अनाथपिंडक परिवर, मुस्लीम महिला परिषद, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन ऑर्गनायझेशन, सुगतनगर महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लुंबिनी बहुउद्देशीय महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेड, सुजाता महिला मंडळ, बीआरएसपी महिला आघाडी, भीमोदय महिला मंडळ, संघर्ष वाहिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी परिषद, विदर्भ तेली समाज महासंघ, बापूजी महिला कल्याण बहुउद्देशिय संस्था, संजीवनी लोकशिक्षण मंडळ, कुणबी महिला समिती, शारदा महिला मंडळ, सोनेरी पहाट, धनोजी कुणबी महिला समाज, जीवन आश्रम सेवा संस्था आदींसह विविध समाजातील महिला संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

जेएनयूवरील हल्ल्याचा निषेध
आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंंदवण्यात आला. यातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Elgar of Women against CAA-NRC in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.