स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:55 AM2019-08-06T02:55:58+5:302019-08-06T02:56:16+5:30

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दणका

Eligible for Railway Traffic Compensation due to their own mistake | स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र

स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र

Next

- राकेश घानोडे 

नागपूर : स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी दिला आहे.

रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणे हा फौजदारी गुन्हा नाही. त्यामुळे जखमी प्रवाशाला भरपाई नाकारली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले. चुकीमुळे होणारा अपघात व स्वत: करवून घेतलेला अपघात यातील फरकही निर्णयात स्पष्ट करण्यात आला. प्रवाशाने स्वत:हून अपघात करवून घेतला हे तेव्हाच म्हणता येते, जेव्हा त्याचा तसा उद्देश असतो. हा उद्देश सिद्ध झाल्यानंतर मात्र, प्रवाशाला रेल्वे कायद्याच्या कलम १२४-ए अंतर्गत भरपाई दिली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले.
२५ मे २०१४ रोजी नागपूर येथील रेखा सूर्यवंशी या पतीसह रेल्वेने इतवारी येथून तुमसरला जात होत्या. गर्दीमुळे त्यांनी फलाटाऐवजी रुळाच्या बाजूने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रेल्वे चालायला लागली आणि रेखा या रेल्वेत चढताना खाली कोसळल्या व त्यांचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली येऊन धडावेगळे झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणात भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. रेखा यांनी स्वत:हून अपघात करवून घेतल्यामुळे त्यांना भरपाई दिली जाऊ शकत नाही हा रेल्वेचा बचाव न्यायाधिकरणाने मान्य करुन याचिका फेटाळली होती.

चार लाख नुकसानभरपाई
उच्च न्यायालयाने रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द करून रेखा यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम रेखा यांना चार महिन्यात अदा करण्याचा आदेश रेल्वेला देण्यात आला. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास या रकमेवर आदेशाच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत ७.५ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट केले.

Web Title: Eligible for Railway Traffic Compensation due to their own mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.