‘पदवीधर’ मतदारयादीतील त्रुटी दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:51+5:302020-11-26T04:22:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात भाजपाने मंगळवारी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन ही बाब मांडली. या त्रुटी लवकरात लवकर दूर करण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली.
पक्षाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, खा. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ गेले होते. अनेक मतदारांच्या आडनावाबाबत संभ्रम आहे. काही मतदारांचे वय चुकीचे असून ते १८ ते २० इतके दाखविण्यात आले आहे. वडिलांच्या नावाऐवजी परत मतदाराचे नाव नमूद करण्यात आले आहे. शिवाय मतदारांचे पत्तेदेखील वेगळे आहेत. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जणांनी वेळेत अर्ज भरल्यानंतरदेखील मतदारयादीत त्यांचे नाव आलेले नाही. या सर्व त्रुटी दूर करण्यात याव्या अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे, संदीप जाधव, गिरीश देशमुख, सुनील मित्रा, राम अंबुलकर, संजय बंगाले, बाल्या बोरकर, रमेश दलाल, विजय फडणवीस, विनय दाणी, श्याम चांदेकर आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते.
नितीन गडकरी यांनादेखील फटका
मतदार यादीमधील त्रुटींचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनादेखील बसला आहे. गडकरी यांना गणेशपेठ स्थित साखळे गुरुजी विद्यालयातील मतदान केंद्रात मतदान करावे लागेल. तर त्यांच्या कुटुंबीयांचे मतदान केंद्र न्यू इंग्लिश शाळा असेल, अशी माहिती दटके यांनी दिली.