नागपुरातील २२७ अतिक्रमणांचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:39 AM2021-03-06T00:39:26+5:302021-03-06T00:41:10+5:30
Encroachments Elimination महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बडकस चौक ते महाल कोतवाली पर्यंतच्या मार्गावर रुंदीकरणात अडथळा आणत असलेल्या १४ दुकानांचे पक्के बांधकाम बुलडोझरच्या मदतीने तोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बडकस चौक ते महाल कोतवाली पर्यंतच्या मार्गावर रुंदीकरणात अडथळा आणत असलेल्या १४ दुकानांचे पक्के बांधकाम बुलडोझरच्या मदतीने तोडले. यावेळी पोलीस बंदोबस्त आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण विरोधी पथकाने लकडगंज झोन अंतर्गत मिनिमातानगरात १० अवैध शेड तोडण्याची कारवाई केली. या मार्गावर सिमेंटचे ४ चबुतरे तोडण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मानकापूर परिसरात फुटपाथवरील ३० अतिक्रमणे हटविण्यात आली. या मार्गावर ५ अतिक्रमणधारकांवर कारवाई करून २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत वंजारीनगर ते शताब्दी चौक, मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौकापासून पुढे आग्याराम देवी मंदिर चौकापर्यंत ३० अतिक्रमणे हटविण्यात आली. या मार्गावर अतिक्रमणधारकांचे १ ट्रक सामान जप्त करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, उदयनगर चौक ते शताब्दीनगर चौकापर्यंत ६० अतिक्रमणे हटवून १ ट्रक सामान जप्त करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत काटोल रोडवर ३२ अतिक्रमणे हटविण्यात येऊन ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जयताळा बाजार ते त्रिमूर्तीनगर चौकापर्यंत फुटपाथवरील ३५ अतिक्रमणे हटवून १ ट्रक सामान जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने केली.