नागपुरातील ६६० अतिक्रमणांचा सफाया : सक्करदरात अतिक्रमण हटविताना लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:32 PM2021-01-21T21:32:09+5:302021-01-21T21:33:44+5:30
Elimination of encroachments शहरातील सर्व झोनमध्ये गुरुवारीही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. नेहरूनगर झोनअंतर्गत सक्करदरा बाजारात अतिक्रमण काढताना लाठीचार्ज करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सर्व झोनमध्ये गुरुवारीही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. नेहरूनगर झोनअंतर्गत सक्करदरा बाजारात अतिक्रमण काढताना लाठीचार्ज करण्यात आला. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक बाजारात पोहोचल्यानंतर अतिक्रमणधारकांनी कारवाईचा विरोध केला. त्यामुळे अतिरिक्त पोलिसांचा ताफा बोलावून अतिक्रमणधारकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
सक्करदरा बाजारात ४२ शेड तोडून ९० अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईत २ ट्रक साहित्य जप्त करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर झोनमध्ये गुरुदेवनगर चौक ते तिरंगा चौक, गजानन चौक ते छोटा ताजबाग, सक्करदरा चौक ते भांडे प्लॉट चौकापर्यंत फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. लकडगंज झोनमध्ये पारडीनगर चौक ते भवानी रुग्णालय, भवानी माता मंदिर ते पुनापूर रोड तसेच नाग नदी पुलादरम्यान फूटपाथवरील ठेले आणि दुकानांची मिळून ६२ अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी ७ शेड तोडून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. आसीनगर झोनमध्ये यादवनगर ते जयभीम चौक, राणी दुर्गावती चौक ते वैशालीनगर सिमेंट रोड व कमाल चौक ते इंदोरा चौकापर्यंत फूटपाथवरील ६८ अतिक्रमण हटविण्यात आले, तसेच या परिसरात १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सतरंजीपुरा झोनमध्ये मारवाडी चौक ते दही बाजार पुलिया, इतवारी रेल्वेस्टेशन ते शांतिनगर चौकापर्यंत ७२ अतिक्रमणे हटविण्यात येऊन २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्ये देवनगर ते प्रेसचे दुकान आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळील ठेला हटविण्यात आला. देवनगर ते छत्रपती चौक आणि खामला रोडवरील ठेले, दुकानांचे अस्थायी अतिक्रमण हटविण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये भोले पेट्रोल पंप ते शहर आरटीओ ऑफिस, लॉ कॉलेज चौक ते रविनगर, अमरावती रोडवरील ठेले व दुकानांचे ९० अतिक्रमण हटविण्यात आले. येथे दोन ठेले आणि २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत आरटीओ कार्यालयासमोरील पूर्ण अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. धंतोली झोनअंतर्गत इमामवाडा चौक ते मेडिकल चौक, अशोक चौक ते बैद्यनाथ चौक, आग्याराम देवी चौक ते गांधीसागर तलावादरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात आले. या परिसरात ८९ अवैध विक्रेत्यांना रस्त्यावरून हटविण्यात आले. चिंचभवनात ४ अस्थायी घरे पाडून ३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
जाफरनगर, इतवारीतही कारवाई
मंगळवारी झोनअंतर्गत जाफरनगर येथील बोरगाव रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. अवस्थी चौक ते बोरगाव रोड, गिट्टीखदान चौक ते रिंग रोडदरम्यान रस्ते आणि फूटपाथवरील ७६ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, १ ठेला आणि १ ट्रक साहित्य जप्त करून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनमध्ये इतवारी नंगा पुतळा, पोस्ट ऑफिस परिसरातील ५२ अतिक्रमण हटविण्यात आले. येथून १८ ठेले जप्त करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.