नागपुरातील आयटी पार्क फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:05 PM2020-01-20T23:05:25+5:302020-01-20T23:55:28+5:30
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला.
पथकाने आयटी पार्क परिसरातील व बिग बाजारच्या बाजूला असलेल्या रस्त्यांच्या फूटपाथवरील पराठा सेंटर, पानटपरी, चहाटपरी, हातठेले यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान तीन ट्रक साहित्य जप्त करून हातठेले जागीच तोडण्यात आले. सहा दुकांनाचे अतिक्रमण करून उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले. व्हीएनआयटी गेटसमोरील श्रीराम पराठा व लोखंडी ठेला तोडण्यात आला. ही कारवाई सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत चालली. कारवाईदरम्यान झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे व अधिकारी उपस्थित होते.
हनुमाननगर झोनच्या पथकाने मानेवाडा चौक ते उदयनगर चौक ते म्हाळगीनगर चौक ते राजापेठ ते हुडकेश्वर चौक, गजानन शाळा ते अयोध्यानगर यादरम्यान मार्गाच्या दोन्ही बाजूचे ५८ अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
नेहरूनगर झोन क्षेत्रातील गुरुदेवनगर चौक ते ईश्वरनगर चौक ते हसनबाग चौक ते खरबी चौक मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. २९ अतिक्रमणांचा सफाया करून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.