गुरांवरील हायडॅटिडोसिस रोगावर निदान करणार ‘एलायझला किट’; माफसूच्या संशोधनाला पेटंट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:44 PM2023-01-13T15:44:45+5:302023-01-13T15:45:11+5:30
रामंधील हायडॅटिडोसिस या रोगाचे अचूक निदान आता शक्य
नागपूर : नागपुरातील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या गुरांवरील हायडॅटिडोसिस रोगावर निदान करणाऱ्या एलायझ किटला भारत सरकारच्या पेंटट कार्यालयातर्फे पेटंट प्रदान करण्यात आले. हायडॅटिडोसिस हा एक गुरांमध्ये आढळून येणारा व निदान करण्यास कठीण असा रोग आहे. त्याचा प्रसार मानवामध्ये सुद्धा होतो.
महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणात या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः ३ टक्के जनावरांमध्ये आढळून आला आहे. बाधा झालेले जनावर विशेष लक्षण दाखवित नाही. त्यामुळे ते दगावल्यानंतरच शवविच्छेदन केल्यास या रोगाचे निदान होते. हायडॅटिडोसिस रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या गुरांमध्ये वजन कमी हाेऊन दूध देण्याची क्षमता घटते आणि वेळीच निदान न झाल्यास जनावर दगावते. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. माफसू अंतर्गत असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यक सामूहिक स्वास्थ्य विभागाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत प्राणीजन्य मानवी आजारावर आधारित संशोधन प्रकल्पाअंतर्गत या किटची निर्मिती केली आहे.
ही किट गुरांमधील हायडॅटिडोसिस या रोगाचे जलद व अचूक निदान करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या किटचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून गुरामंधील हायडॅटिडोसिस या रोगाचे अचूक निदान आता करणे शक्य आहे. विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. विलास वैद्य, विभागप्रमुख डाॅ. रवींद्र झेंडे, विद्यमान कुलगुरू आणि विभागाचे माजी प्रमुख डाॅ. आशिष पातुरकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक डाॅ. अशोक कुमार आणि वरिष्ठ संशोधन सहायक डाॅ. चारुशीला राऊत यांचे योगदान मिळत आहे. विद्यापीठाचे संचालक संशोधक डाॅ. नितीन कुरकुरे, संचालक शिक्षण व अधिष्ठाता पशुविज्ञान डाॅ. शिरीष उपाध्ये तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. अजित रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.