दारूबंदी उठली; माफियांच्या स्वप्नांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:51+5:302021-05-29T04:07:51+5:30
भिवापूर : चंद्रपूर जिल्हा दारूबंदीपासून सीमावर्ती भागातील अवैध विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले. एवढेच नव्हे तर काही तरुणांना याच दारूबंदीने ...
भिवापूर : चंद्रपूर जिल्हा दारूबंदीपासून सीमावर्ती भागातील अवैध विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले. एवढेच नव्हे तर काही तरुणांना याच दारूबंदीने दारूमाफिया म्हणून जन्म घातला. दररोज वाहणारा दारूचा महापूर आणि लाखोंच्या व्यवहारामुळे आंबट शौकही वाढले. अशातच राज्य शासनाने गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली आणि दारूमाफियांची झोप उडाली.
भिवापूर, उमरेड व पवनी (जि. भंडारा) ही तीन तालुके चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू पोहोचविणारे मोठे ‘हब’ ठरले. काही वर्षांपूर्वी मोलमजुरी, चोरीचपाटी आणि वेटरचे काम करणारे तरुण दारूमाफिया म्हणून काम करू लागले. अवैध दारू व्यवसायातूनच अनेकांनी महागड्या गाड्या आणि आलिशान घरे उभारलीत. स्वत:च्या ऐशआरामावर दररोज हजारोची उधळपट्टी हे माफिये करू लागले. याच अवैध धंद्यातून कमाविलेल्या पैशांतून काहींनी पांढरे कपडे चढवित निवडणूक लढण्याची तयारी चालविली. अशी कधी नव्हे ती मोठमोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दारूमाफियांची धडपड सुरू असतानाच राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली आणि माफियांच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. त्यामुळे गुरुवारी रात्रीच्या सुमारास निलज फाटा, भिसीमार्ग, बसस्थानक परिसर, आंभोरा रोड, नक्षी मार्गावर दारूमाफियांचे टोळके आपल्या सुख-दु:खाच्या चर्चेत रंगले होते. दारूबंदी उठल्याने आता धंदा कोणता करायचा, खर्च वाढला आहे. कर्जाचे हप्ते भरायचे आहे, असा सूर त्यांच्या चर्चेतून निघत होता.
लोखो रुपयांची उधारी फसणार?
अवैध दारूच्या गोरखधंद्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. बंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात शहरापासून तर खेड्यापर्यंत प्रत्येक चौकांत दारूचे घोट मिळेल अशी व्यवस्था उभी झाली. माफियांनी दारूचा पुरवठा केल्यानंतर तेथील विक्रेता मालाची विक्री करून पुरवठादारांचे पैसे द्यायचा. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील दारूमाफियांची लाखो रुपयांची उधारी चंद्रपूर जिल्ह्यात फसली आहे. अशातच दारूबंदी उठल्यामुळे ही उधारी कशी वसूल करायची, असा प्रश्न दारूमाफियांना पडला आहे.
-
मिशन गडचिरोली आणि वर्धा
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच दारूबंदी आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा दारूबंदीने स्थानिक माफियांना जन्माला घातले. आता चंद्रपूर जिल्ह्यातील बंदी उठली असली तरी वर्धा आणि गडचिरोली येथील बंदी कायम आहे. अशात अवैध दारूच्या गडेलठ्ठ धंद्याशिवाय पर्याय नसल्यामुळे उद्ध्वस्त झालेले माफिये आता गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे.