जगनाडे को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ८६ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:10 AM2021-09-07T04:10:59+5:302021-09-07T04:10:59+5:30

शाखा प्रमुखासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्री संत जगनाडे क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील कर्मचाऱ्यांनी बोगस ...

Embezzlement of Rs. 86 lakhs in Jagannade Co-operative Society | जगनाडे को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ८६ लाखांचा अपहार

जगनाडे को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ८६ लाखांचा अपहार

googlenewsNext

शाखा प्रमुखासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : श्री संत जगनाडे क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील कर्मचाऱ्यांनी बोगस दस्तऐवजाच्या आधारावर ८६ लाख रुपयांचे कर्ज घेऊन सोसायटी व खातेदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसील पोलिसांनी सोसायटीच्या शाखा प्रमुखासह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विनोद गजानन फटिंग (शाखा प्रमुख), अरविंद सदाशिव उराडे (एजंट), देवेंद्र विनायक सरोदे (एजंट), नितेश गोपाळराव खापेकर (लिपिक) आणि दीपक बाबूराव तेलमासरे (चपराशी) अशी आरोपींची नावे आहेत.

गंजी पेठ येथे श्री संत जगनाडे को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्यालय आहे. जागनाथ बुधवारी येथील भारतमाता चौकात त्याची एक शाखा आहे. आरोपी याच शाखेत कार्यरत आहेत. सोसायटीमध्ये रक्कम जमा करण्यासोबतच सभासदांना कर्जही देते. आरोपी हे लोकांकडून पैसे गोळा करणे, कर्ज वसुली आदी कामे करतात. सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी आरोपींच्या माध्यमातून फिक्स डिपॉझिट केले आहे. आरोपींनी अशा ग्राहकांचे बोगस गुंतवणूक प्रमाणपत्र सोसायटीत सादर करून कर्ज घेतले. ग्राहक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली नाही. त्यामुळे आरोपी साेसायटी व ग्राहकांची फसवणूक करीत राहिले.

अलीकडेच काही लोकांच्या फिक्स डिपॉझिटचा कालावधी संपल्याने ग्राहक सोसायटीकडे आले. त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. तेव्हा साेसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर कर्ज असल्याचे सांगितले. ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी गुंतवणूक प्रमाणपत्राची मूळ प्रत सोसायटीला परत करावी लागते. ग्राहकांनी मूळ प्रमाणपत्र दाखविल्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी पडताळणी केली असता आरोपींनी बोगस प्रमाणपत्र सादर करून कर्ज मंजूर केल्याचे आढळून आले. यानंतर साोसायटीने शाखेचे ऑडिट केले. यात आरोपींनी २००१ ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान ८६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा खुलासा झाला. या आधारावर सोसायटीच्या व्यवस्थापक दुर्गा नरेश भावलकर यांनी तहसील ठाण्यात तक्रार दाखल केली. एएसआय नंदकिशोर हिंगे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Embezzlement of Rs. 86 lakhs in Jagannade Co-operative Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.