शालेय पाेषण आहारात अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:29+5:302021-01-21T04:09:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : शालेय पाेषण आहारात अपहार केल्याप्रकरणी दत्तवाडी येथील कै. के. सी. प्रबाेधनकार ठाकरे माध्यमिक शाळेच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शालेय पाेषण आहारात अपहार केल्याप्रकरणी दत्तवाडी येथील कै. के. सी. प्रबाेधनकार ठाकरे माध्यमिक शाळेच्या चपराशाला पाेलिसांनी अटक केली आहे. यात आराेपीने गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ३ लाख ७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रूपेश बळवंतराव वानखेडे (४०, रा. प्लाॅट. नं. ८८, नवनीतनगर, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या चपराशाचे नाव आहे. आराेपीने पूर्वपरवानगी न घेता शाळेमधून शालेय पाेषण आहाराचे अंदाजे २५० किलाेग्रॅम तांदूळ किंमत ७,५०० रुपये स्वत:च्या फायद्यासाठी शाळेबाहेर चाेरून नेले. दरम्यान, शालेय पाेषण आहार अधीक्षक राजेशकुमार लाेखंडे यांच्या तक्रारीवरून वाडी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. आराेपीने गुन्ह्यात वापरलेली एमएच-४०/एसी-८३८९ क्रमांकाची हाेंडाई एक्सेंट कार किंमत अंदाजे तीन लाख व ७,५०० रुपये किमतीचे तांदूळ असा एकूण ३ लाख ७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीला न्यायालयात हजर करून एक दिवसाची पाेलीस काेठडी मिळविली आहे.
पाेलिसांनी जप्त केलेली कार ही शाळेच्या संचालकांची असल्याचे समजते. या अपहार प्रकरणात अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात असून, शिक्षण क्षेत्रात विविध चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, जी. एस. मुंडे, हवालदार सुनील मस्के करीत आहेत.