महिलेच्या उपचारासाठी नागपुरात विमानाची इमर्जन्सी लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:17 PM2018-10-24T21:17:39+5:302018-10-24T21:18:56+5:30
विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली.
मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील रहिवासी झाशी राणी जवाहर ही ३२ वर्षीय महिला तिचे वडील अनू जनल्यू जवाहर यांच्यासमावेत बनारसला मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. ही महिला किडनीच्या आजाराने पीडित असून डायलिसिसही सुरू आहे. याशिवाय त्यांना अस्थमाचाही त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. बनारसमध्ये दर्शनानंतर इंडिगोच्या ६ ई- ९१६ या वाराणसी-हैदराबाद फ्लाईटने ते सकाळी ८.५० वाजता परतीच्या प्रवासासाठी निघाले. हे विमान उडाण घेतल्याच्या तासाभरानंतर झाशी राणी यांना अस्थमाचा अटॅक आला. वडिलांनी विमानाच्या चालक दलाकडे आकस्मिक सेवेची विनंती केली. चालक दलाने त्यामुळे नागपूर एटीसीकडे विमानतळावर आकस्मिक लँडिंगसाठी परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर सकाळी १०.०४ वाजता विमान नागपूरच्या विमानतळावर थांबले. त्यानंतर प्रवासी रुग्ण महिलेला विमानतळावर उपस्थित डॉक्टरांद्वारे तपासण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली. पाऊण तासाच्या या प्रक्रियेनंतर सकाळी ११ वाजता विमान हैदराबादकडे रवाना झाले.
रुग्ण महिलेला रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचाराने स्थिती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीने ही महिला सायंकाळी ५ वाजता इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली. वेळेवर उपचार मिळाल्याने या महिलेचे प्राण वाचू शकले. विशेष म्हणजे यापूर्वी सोमवारी अशाचप्रकारे महिलेची प्रकृती बिघडल्याने विमानाची आकस्मिक लँडिंग करावी लागली होती, मात्र या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास नागपूर विमानतळाच्या सर्व एजन्सी तत्परतेने प्रतिक्रिया देत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.