बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर
By मोरेश्वर मानापुरे | Published: September 15, 2024 07:37 PM2024-09-15T19:37:32+5:302024-09-15T19:38:56+5:30
चितगांव येथून ओमानला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात घडला प्रकार
नागपूर : सलाम एअर कंपनीच्या बांगलादेशाच्या चितगांव येथून ओमानला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यानंतर विमानाचेनागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवाशाला किम्स-किंग्जवे रुग्णालयात भरती केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
मोहम्मद खैर (३३) असे रुग्णाचे नाव आहे. उड्डाणादरम्यान त्याची प्रकृती बिघडली आणि तोंडातून फेस येऊ लागला. त्याने तातडीने वैद्यकीय मदत मागितली. वैमानिकाने डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. मान्यतेनंतर विमानाचे लँडिंग करण्यात आले. लँडिंग केल्यावर किम्स-किंग्जवे रुग्णालयाचे डॉ. रुपेश बोकाडे यांच्या नेतृत्वात अन्य डॉक्टरांनी रुग्णाची विमानातच तपासणी केली.
तपासणीदरम्यान प्रवाशाची लक्षणे सामान्य होती. पण तोंडातून फेस आल्याने प्रवाशाला अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. तिथे त्यांच्यावर डॉ. रुपेश बोकाडे उपचार करीत आहेत. सध्या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे महाव्यवस्थापक (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी लोकमतला दिली.