स्फोटाच्या धमकीनंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Published: September 1, 2024 07:24 PM2024-09-01T19:24:21+5:302024-09-01T19:25:01+5:30

जबलपूर ते हैदराबाद उड्डाण : तपासणीत आक्षेपार्ह काहीही सापडले नाही

Emergency landing of plane in Nagpur after blast threat | स्फोटाच्या धमकीनंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

स्फोटाच्या धमकीनंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

नागपूर : बॉम्ब स्फोटाची धमकी देणारी चिठ्ठी इंडिगोच्या जबलपूर-हैदराबाद विमानात एअर होस्टेसला सापडल्यानंतर या विमानाचे रविवारी सकाळी ९.२२ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या तपासणीत आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. अखेर विमान दुपारी ३.२५ वाजता हैदराबादला रवाना झाले. काही प्रवाशांना बसने हैदराबादला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आणि विमानतळावर भितीचे वातावरण पसरले. प्रवाशांमध्ये बॉम्बची चर्चा होती. विमानतळ प्रशासनाने घटनेची योग्य माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. 

प्राप्त माहितीनुसार, एअर होस्टेसला सापडलेल्या चिठ्ठीत ‘ब्लास्ट ९’ असे लिहिले होते. सुरक्षा यंत्रणांनी विमानाची कसून चौकशी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. 

बॉम्ब आणि स्फोटाचा संदेश ज्योतिस्मिता सैकिया नावाच्या केबिन क्रूला स्वच्छतागृहात वापरत असलेल्या टॉयलेट रोलच्या तुकड्यावर निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेला आढळला. या संदेशात केवळ ‘ब्लॉस्ट९’ असे लिहिले होते. वैमानिकाने या घटनेची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ८.५६ वाजता दिली. विमानतळाच्या वरिष्ठ विमानतळ संचालकांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविला. सोनेगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेळके यांना एफआरआरबाबत सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री सकाळी विमानाने जाणार होते मुंबईला
विमान नागपूर विमानतळावर उतरताच प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि विमानाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढा घातला. विमानाची बॉम्ब स्क्वाड, श्वान पथक, स्थानिक बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली. नागपूर विमानतळावरून सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याने विमानतळ प्रशासन आधीच अलर्टवर होते. याच दरम्यान बॉम्बची अफवा उडाल्याने विमानतळावर खळबळ उडाली.

Web Title: Emergency landing of plane in Nagpur after blast threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.