आपात्कालीन रुग्णांना औषध मिळणे कठीण!
By Admin | Published: November 11, 2014 01:01 AM2014-11-11T01:01:50+5:302014-11-11T01:01:50+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) आपात्कालीन रुग्णांना औषध वितरित करण्यासाठी असलेली खिडकी बंद केली आहे. परिणामी, रुग्णांना सहज औषध मिळणे कठीण झाले आहे.
मेडिकल : खिडकीवरून औषध वितरण बंद
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) आपात्कालीन रुग्णांना औषध वितरित करण्यासाठी असलेली खिडकी बंद केली आहे. परिणामी, रुग्णांना सहज औषध मिळणे कठीण झाले आहे. मेडिकल प्रशासनाने परिचारिकांकडून औषधोपचार करण्याची नवी पद्धत सुरू केली असली तरी अनेकांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जुन्या आपात्कालीन विभागाच्या बाजूला दुपारी २ ते सकाळी ८ वाजतापर्यंत औषध वितरणाची एक खिडकी सुरू असायची. आपात्कालीन रुग्णांना या खिडकीवरूनच औषधे मिळायची. आपात्कालीन रुग्णांना वेळेवर औषधी मिळावी किंबहुना औषधांविना रुग्णाचा जीव जाऊ नये म्हणून प्रशासनाने ही व्यवस्था केली होती. परंतु १५ दिवसांपूर्वी अचानक ही खिडकी बंद करण्यात आली. यामुळे रुग्णांना औषध मिळणे कठीण झाले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, औषध वितरण खिडकीच्या परिसरात रात्री अंधार राहत असल्याने व फार कमी रुग्णांना औषध वितरित होत असल्याने मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांनी ही खिडकी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी औषध वितरणाची जबाबदारी परिचारिकांकडे सोपविली आहे. आपात्कालीन रुग्ण आल्यास परिचारिकांकडून औषध दिले जात आहे. मात्र, संबंधित परिचारिकाकडे आधीच कामाचा भार असल्याने या नवीन जबाबदारीमुळे रुग्णांना सहज औषध मिळणे दुरापास्त झाले आहे. या नव्या पद्धतीचा फटका अनेक रुग्णांना बसत असून, त्यांच्यावर बाहेरून औषध घेण्याची वेळ आली आहे.
बंद करण्यात आलेली खिडकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विविध सामाजिक संस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)