विद्यार्थिनीवर अत्याचार करून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’, ‘इन्स्टाग्राम फ्रेंड’ला अटक
By योगेश पांडे | Published: July 3, 2023 06:02 PM2023-07-03T18:02:15+5:302023-07-03T18:03:11+5:30
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : एका अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘इन्स्टाग्राम’वर एका तरुणाशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली. संबंधित आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अगोदर अत्याचार केले. तिने लग्नाची विचारणा केली असता त्याने ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करत तिला धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ऋषभ विनेश उंदीरवाडे (२४, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. ऋषभचे लग्न झाले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याची १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला प्रेम करतो असे सांगितले व तिनेदेखील होकार दिला. त्याने तिच्यापासून लग्न झाल्याची बाब लपवून ठेवली होती. १२ मे ते २२ मे या कालावधीत त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
काही दिवसांअगोदर तिने त्याला परत विचारले असता त्याने नकार दिला. यावरून मुलीने त्याच्यापासून संबंध तोडत असल्याचे सांगितले. यावरून संतापलेल्या ऋषभने ‘तू मला सोडून गेली तर मी स्वत:चे बरेवाईट करेन व तुझ्या घरच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात फसवेन’, अशी धमकी दिली. यामुळे हादरलेल्या विद्यार्थिनीने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली. तिने नवीन कामठी पोलीस ठाण्यात ऋषभविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.