पोटच्या गोळ्यांशी ‘गळाभेट’ झाली अन् कैद्यांचे डोळे पाणावले! घडला भावनिक अनुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 11:42 AM2022-09-02T11:42:13+5:302022-09-02T11:48:30+5:30

कारागृह ध्वजदिनानिमित्त अडीच वर्षांनंतर आयोजन; कारागृहातील भिंतींनाही फुटला भावनेचा पाझर

emotional meeting of prisoners with their families at nagpur central jail on the occasion of jail flag day | पोटच्या गोळ्यांशी ‘गळाभेट’ झाली अन् कैद्यांचे डोळे पाणावले! घडला भावनिक अनुबंध

पोटच्या गोळ्यांशी ‘गळाभेट’ झाली अन् कैद्यांचे डोळे पाणावले! घडला भावनिक अनुबंध

Next

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे माणुसकी हरवल्यामुळेच गुन्हे करतात व त्यांच्यात दयामाया नसते असा अनेकांमध्ये समज आहे. मात्र, गुन्हेगारदेखील मनुष्यच असतो व त्यालादेखील भावभावना असतात. आपल्या कुटुंबीयांची भेट घ्यावी, चिमुकल्यांना प्रेमाने जवळ घ्यावे व आप्तांशी गळाभेट घ्यावी, यासाठी त्यांचे मन आसुसले असते. ज्यावेळी त्यांना अशी संधी मिळते तेव्हा बहुतांश कैद्यांमधील गुन्हेगाराचा मुखवटा गळून पडतो अन् उरतो तो केवळ कुटुंबाप्रति जिव्हाळा बाळगणारा एक कुटुंबप्रमुख.

गुरुवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असेच चित्र पाहायला मिळाले. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर कुटुंबीय, मुलांशी कैद्यांची ‘गळाभेट’ झाली अन् कैद्यांसह उपस्थितांचे डोळे पानावले. कारागृहातील भिंतींनाही भावनेचा पाझर फुटल्याचे चित्र होते.

कारागृह ध्वजदिनाच्या निमित्ताने सिद्धदोष बंदिवानांच्या किशोरवयीन मुलांसाठी प्रत्यक्ष ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आज मध्यवर्ती कारागृह येथे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुला-मुलींनी आपापल्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावनांना व्यक्त करत संवाद साधला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १२० कैद्यांची त्यांच्या १८९ मुला-मुलींशी प्रत्यक्ष भेट झाली. बंदिवानांच्या १८९ पाल्यांची आप्तेष्ठांशी प्रत्यक्षरीत्या भेट घडवून आणण्यात आली. यावेळी कारागृह उप महानिरीक्षक स्मिता साठे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव हाडे, वामन निमजे, तुरुंगाधिकारी दीपक भोसले, माया धतुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोनानंतरची पहिलीच जवळून भेट

कोरोना महामारीच्या संकटकाळात कित्येक मुला-मुलींना त्यांच्या पालकांशी भेटता आले नव्हते. मात्र, यंदा कारागृह विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले. या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. बंदिवानांनी आपापल्या मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक मुद्दे संदर्भात हितगुज यावेळी केले. बंदिवान त्यांच्या मुलाबाळांना भेटल्यानंतर त्यांचे कुटुंबीयदेखील भावनिक झाले. कारागृहाच्या चार भिंतींआड असलेल्या नीरव शांततेला चिरत लहान मुलांच्या गोंगाटाने वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. गुन्हेगारी जग किती वाईट असते, याची जाणीवसुद्धा बंदिवानांना झाली असावी.

कुठे हसू, तर कुठे आसू

अगदी तान्ह्या मुलाबाळांपासून ते किशोरवयीन मुला-मुलींना घेऊन कैद्यांचे कुटुंबीय सकाळीच कारागृहात पोहोचले होते. याप्रसंगी अनेकांना क्षणात रडू कोसळले. तर आपले पती, पत्नी, आईवडिलांना बघून कोणाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळाले. कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीदेखील हे दृश्य पाहून भावनिक झाले होते.

Web Title: emotional meeting of prisoners with their families at nagpur central jail on the occasion of jail flag day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.