आंतरराष्ट्रीय अभिलेख सप्ताह; कपडे धुण्याच्या दगडातून प्रकटली सम्राट अशोकाची राजाज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:01 AM2021-06-11T10:01:22+5:302021-06-11T10:03:28+5:30
Nagpur News नागभीड तालुक्यातील देवटकजवळचे चिंकमारा हे गाव. येथील एका चिंचेच्या झाडाजवळ मोठी पसरट शिळा ठेवली होती. गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करायच्या. त्या शिळेवर वेडीवाकडी अक्षरे होती पण ती कुणाला कळणे शक्य नव्हते.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागभीड तालुक्यातील देवटकजवळचे चिंकमारा हे गाव. येथील एका चिंचेच्या झाडाजवळ मोठी पसरट शिळा ठेवली होती. गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करायच्या. त्या शिळेवर वेडीवाकडी अक्षरे होती पण ती कुणाला कळणे शक्य नव्हते. एका व्यक्तीला देव दिसावा तसे त्या अक्षरांमध्ये विशेष असल्याचे समजले. त्याने पुरातत्व विभागाला संपर्क करून माहिती दिली आणि पुढे आला तो इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील इतिहास. मौर्य राजवंशात सम्राट अशोकाला स्वामी मानणाऱ्या विदर्भाची राजवट दिलेल्या ‘धर्ममहामात्रा’ने ‘प्राण्यांची हिंसा करू नका, केल्यास शिक्षा होईल’, ही राजाज्ञा तेव्हाच्या चिकुम्बरी या गावी त्या शिळेवर कोरून लावली होती. आता हा शिलालेख नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहे.
प्राचीन काळामध्ये भारत देश भाषा, तत्वज्ञान, विज्ञान, कला, स्थापत्यामध्ये प्र्रगत होता. हे ज्ञान मौखिक किंवा लिखित स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत हस्तलिखितांच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न झाला. कागदाचा शोध लागेपर्यंत भोजपत्रे, ताडपत्रे (झाडांच्या पानांवर), चर्मपत्रे, ताम्रपट, कापड, लाकूड, दगड (शिळा) किंवा धातूंचा वापर करून संदेश पोहचविला जात होता. या अभिलेखांमुळे प्राचीन काळातील राजवटी, त्यांचा काळ, त्यांची राजाज्ञा आणि तो इतिहास आजही जिवंत राहिला आहे. म्हणूनच शिवरायांची राजमुद्रा आजही अभिमान बाळगायला भाग पाडते. कागदाचा शोध लागण्याआधी प्राचीन काळातील अगदी पहिल्या शतकापासूनचे अनेक ताम्रपट, नाणी, भोजपत्र, शिलालेख मध्यवर्ती संग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक व्ही.एन. निट्टूरकर यांनी हा ऐतिहासिक वारसा समजावून सांगितला. मध्य भारतातील प्राचीन काळाचा इतिहास या अभिलेखांमधून सहज अभ्यासता येताे.
- नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील गाेजाेली या गावी सापडलेला वाकाटक नरेश पृथ्वीसेन द्वितीय याचा ताम्रपट संग्रहालयात आहे.
- सिरसा, जि. अकाेला येथून सापडलेला इ.स. ९ व्या शतकातील राष्ट्रकुट राजा गाेविंद तृतीय याचा ताम्रपट.
- वाकाटक नरेश प्रवरसेन द्वितीय याचा ५ व्या शतकातील ताम्रपट. बालाघाट, मध्य प्रदेशच्या तिराेडी गावी सापडला हाेता.
- पवनी, जि. भंडारा येथील दुसऱ्या शतकातील क्षत्रप राजवंशातील ‘कुमार रूपीअम्म’चा छायास्तंभ पहावयास मिळताे.
- साेन्याचा मुलामा दिलेला कापडावरील अभिलेख, भाेजपत्रे, ताडपत्रे येथे आहेत.
- सिंधू संस्कृतीतील लेखन कलेचे पुरावे असलेले ताम्रपट, नाणी, दगड किंवा धातूंवरील मुद्रा संग्रहालयात लक्ष वेधून घेतात.
- प्राचीन विविध राजवंशाच्या काळातील नाणी व त्यावर काेरलेले अभिलेख त्या राजवटीचा इतिहास सांगतात.
- १४ व्या शतकातील ग्यासुद्दीन खिलजी याचा पारसी भाषेतील शिलालेख. सुलतान बुराण निजामशाह, मुहमदशहा खिलजी अशा मुस्लिम राजवटींचे शिलालेखही लक्ष वेधून घेतात.
- चेदीवंशी लक्ष्मणराज दुसरा, माळव्याचे परमार राजवट, शिव आराधना करणारा कलचुरी नरेश जयसिंहदेव, यादववंशीय राजा रामचंद्र अशा हिंदू राजांच्या राजवटींचे शिलालेखही उल्लेखनीय आहेत.
आज कागदाचा शाेध लागला तरी काेणतेही अभिलेख डिजिटल पद्धतीने जतन करून ठेवणे गरजेचे असते. मात्र त्या काळातील राजांचे, विद्वानांचे शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाेजपत्रे आदींच्या माध्यमातून आजही जिवंत आहे. प्राचीन इतिहासाचा उलगडा करणारा हा ऐतिहासिक वारसा आहे.
- जया वाहने, अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय