वीज बिल वसुलीवर भर, सेवेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:26+5:302021-04-02T04:07:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करणे हे सुद्धा महावितरणचे काम आहे. बुधवारी शहरातील हजारो नागरिकांना कडाक्याच्या उन्हाळ्यात रात्र अंधारात काढावी लागली. सायंकाळी गेलेली वीज दुसऱ्या दिवशीपर्यंत आलीच नाही. परिणामी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे थकबाकीची वसुली करा, पण सेवेचे काय असा प्रश्न नागरिकांकडून महावितरणला विचारला जात आहे.
सध्या कडक उन्ह तापू लागले आहे. कुलरही सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत वीज गेली तर काय होईल, याची कल्पना सर्वांनाच आहे. बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास असाच प्रकार घडला. हिवरीनगर, पडोळेनगर परिसरातील वीज अचानक गेली. बराच वेळ वाट पाहूनही वीज न आल्याने लोक घराबाहेर निघाले. काही लोकांनी वीज कार्यालयात फोन केला. तेव्हा ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याचे सांगण्यात आले. काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु काहीच फायदा झाला नाही. रात्री गेलेली वीज गुरुवारी सकाळी ११ वाजता काही वेळेसाठी आली आणि पुन्हा गेली. ती बराच वेळ आलीच नाही. य ट्रान्सफाॅर्मरच्या बिघाडामुळे केवळ हिवरीनगर व पडोळेनगरच नव्हे तर न्यू पँथरनगर, लोकजीवननगर, चांदमारी, संघर्षनगर, महाल आदी परिसरातील हजारो लोकांना रात्र अंधारात काढावी लागली.
अलीकडे महावितरण ज्या गतीने थकबाकी वसुली मोहीम राबवित आहे. तशीच तत्परसेवासुद्धा लोकांना उपलब्ध का केली जात नाही, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी केला.
- हा त्रास नेहमीचाच
या परिसरातील नागरिक आणि माजी नगरसेवक असलेले यशवंत मेश्राम यांनी सांगितले की, वीज गेली की ती तासन्तास येतच नाही. ही या परिसरातील रोजचीच बाब झाली आहे. ट्रान्सफाॅर्मरची नियमित देखभाल होत नसल्याने हे प्रकार होत आहे. बुधवारी लाईट गेली तेव्हा मी स्वत: वाठोडा स्टेशनचे इंचार्ज यांना सूचना दिली. परंतु काहीच झाले नाही. नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. असाच प्रकार सुरू राहिला तर नागरिकांचा असंतोष उफाळून आल्याशिवाय राहणार नाही.