संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

By योगेश पांडे | Published: November 16, 2024 05:53 AM2024-11-16T05:53:21+5:302024-11-16T05:53:43+5:30

जातीय समीकरणांचे गणित साधून मतदारांना खेचून आणणे हे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.

Emphasis on door to door campaigning around the rss headquarters | संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत; तर एकेकाळचा पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा सर करण्यासाठी काँग्रेसने दंड थोपटले आहेत. मात्र हलबा समाजाचे रमेश पुणेकर यांच्या आव्हानामुळे लढतीत रंगत आली आहे. भाजपचे प्रवीण दटके व काँग्रेसचे बंटी शेळके या तरुण उमेदवारांमध्ये जनतेत जाऊन प्रचार करण्याची स्पर्धाच सुरू आहे. अर्थात यावेळी बरीचशी समीकरणे बदलली असल्यामुळे थेट प्रचारासोबत गनिमी काव्यावरदेखील भर दिला जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या या मतदारसंघात हलबा, मुस्लिम या समाजाच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. मात्र महाविकास आघाडी व महायुतीकडून या दोन्ही समाजांतील उमेदवार देण्यात आलेले नाहीत. हलबा समाजाला आमदार, उपमहापौर, नगरसेवक आदी पदे देणाऱ्या भाजपने तीनवेळचे आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापले. पंधरा वर्षांत प्रथमच हलबा उमेदवार दिला नाही. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना रिंगणात उतरविले आहे. अशा स्थितीत जातीय समीकरणांचे गणित साधून मतदारांना खेचून आणणे हे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांना या मतदारसंघातून ९६ हजार ९०५ मते मिळाली; तर विकास ठाकरे यांना ७१ हजार ४४ मते मिळाली. गडकरी यांचे मताधिक्य २५ हजार ८६१ इतके होते. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत गडकरींचे मताधिक्य ३ हजार ३५४ मतांनी वाढले.

पाच मुस्लिम उमेदवारांचा प्रभाव किती?
या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात असून त्यात पाच उमेदवार मुस्लिम आहेत. त्यांच्यामुळे किती मतविभाजन होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. एमआयएमने मात्र येथे उमेदवार दिलेला नाही. बसपाने मिलिंद गजभिये यांना उभे केले आहे; तर वंचित बहुजन आघाडीने हाजी मोहम्मद कलाम यांना पाठिंबा दिला आहे.

हटके गृहसंपर्क करण्यावर भर
शेळके, दटके व पुणेकर यांच्याकडून या मतदारसंघात गृहसंपर्कावर जास्त भर देण्यात येत आहे. भाजपकडून दिग्गज नेत्यांच्या सभादेखील लावण्यात आल्या व सिनेस्टार्सच्या रोड शोचेदेखील नियोजन आहे. दटके महिला, ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करताना दिसून येतात, तर बंटी शेळके त्यांची धावती स्टाईल आणि प्रचाराच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या मतदारसंघात कमालीचे सक्रिय आहेत. समाजातील सर्वच स्तरांमध्ये संघ स्वयंसेवकांच्या बैठका होत असून जास्तीत जास्त मतदानाचे प्रयत्न सुरू आहेत.

विधानसभा २०१४
विकास कुंभारे : भाजप (विजयी) : ८७,५२३
अनिस अहमद : काँग्रेस : ४९,४५२
ओंकार अंजीकर : बसपा : ५,५३५
मो. कामील अन्सारी : राष्ट्रवादी : ४,८१८
आभा पांडे : अपक्ष : ४,४४९

विधानसभा : २०१९
विकास कुंभारे : भाजप (विजयी) : ७५,६९२
बंटी शेळके : काँग्रेस : ७१,६८४
अब्दुल शारीक पटेल : एआयएमएआयएम : ८,५६५
नोटा : २,१४९
धर्मेंद्र मंडलिक : बसप : १,९७१

लोकसभेतील मते (२०२४)
नितीन गडकरी : भाजप : ९६,९०५
विकास ठाकरे : काँग्रेस : ७१,०४४
योगीराज लांजेवार : बसपा : १,०४९

एकूण उमेदवार : २०
एकूण मतदार : ३,४१,१६९
पुरुष मतदार : १,६८,१०७
महिला मतदार : १,७३,०२२
तृतीयपंथी मतदार : ४०

Web Title: Emphasis on door to door campaigning around the rss headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.