मनपाचा ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:39+5:302021-02-24T04:07:39+5:30
दूध, भाजी विक्रेते, दुकानदारांसाठी तपासणी शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता मनपा ...
दूध, भाजी विक्रेते, दुकानदारांसाठी तपासणी शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता मनपा प्रशासनाने शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद केले आहेत. तसेच शनिवार व रविवारी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रशासनाने ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर देण्याला सुरुवात केली आहे. यासाठी शहरातील हॉटस्पॉट परिसरातील बाजार, सोसायट्या यासह अन्य भागात कोरोना तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. भाजी विक्रेते, दुकानदार, मोलकरीण आदींची तपासणी केली जात आहे. खबरदारी म्हणून काही पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे नियमानुसार पाचपेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागात अपार्टमेंट, कार्यालयांना सील करण्यात आले आहे.
महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहराच्या विविध भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मनपा प्रशासन ठिकठिकाणी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून कोविड तपासणी करीत आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मंगळवारी तहसील पोलीस स्टेशन गांधीबाग, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय, आईबीएम सिविल लाइन्स, लोणारा येथील सेंट्रल इंडिया कॉलेज आदी ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले. नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. झोनल वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात डॉ.शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू, डॉ.साहिल अन्सारी, डॉ.मोनाली कायरकर, डॉ. आशिष हरणे आदींनी नागरिकांची कोविड चाचणी केली.
...
दोन डझनहून अधिक वस्त्या सील
पाच वा त्याहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या वस्त्या सील करण्यात आल्या आहेत. यात लक्ष्मीनगर झोनमधील इंद्रप्रस्थ ले-आउट, स्वावलंबी नगर, पिझ्झा हट, बजाजनगर, जयताळा येथील पायोनर ट्युलिप, अंकुर अपार्टमेंट, जयप्रकाश नगर, लक्ष्मी केशव अपार्टमेंट, आरटीपीएस रोड, लक्ष्मीनगर, तात्या टोपे नगर, प्लॉट क्र. ४४ राजीवनगर, प्लॉट क्र. १ श्रेयस साई अपार्टमेंट सरस्वती विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, संचयनी प्रेस्टिज अपार्टमेंट, पूनम विहार. धरमपेठ झोनमधील पांढराबोडी, प्लॉट क्र. ५ साई मंगल अपार्टमेंट, गिरीपेठ, प्लॉट क्र. ७५ पार्क क्यू बिल्डिंग फार्मलॅन्ड रामदासपेठ. हनुमाननगर झोन झोनमधील प्लॉट क्र. ८८ लाडीकर लेआउट, प्लॉट क्र. २५ गोविंद प्रभू नगर, राजापेठ, धंतोली झोनमधील टाटा कॅपिटल हाइट, टॉवर ४, अरिहंत अपार्टमेंट. नेहरूनगर झोनमधील स्वामी नारायण एनक्लेव्ह सदाशिवनगर, वाठोडा, लकडगंज झोनमधील नैवद्यम इस्टोरिया मंगल कार्यालय, कळमना रोड, मंगळवारी झोनमधील फ्लॅट क्र. ३०५, गोपाला अपार्टमेंट, मेकोसाबाग, स्टेट बँक ऑफ इंडिया रेल्वे स्टेशनजवळ आदींचा समावेश आहे.