१८ ते ४४ वयोगटातील महिलांच्या लसीकरणावर जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:18+5:302021-05-29T04:07:18+5:30
नागपूर : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ग्रामीण भागात १८ ते ४४ वयोगटातील महिलांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषद ...
नागपूर : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ग्रामीण भागात १८ ते ४४ वयोगटातील महिलांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आग्रही आहे. परंतु लसीची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यात अजूनही या वयोगटातील लसीकरण सुरू झाले नाही. तिसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जि.प.ने केंद्र सरकारकडेच लसीची मागणी केली असल्याचे जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असून त्यात लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जवळपास १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यात वैद्यकीय उपकरणे, सामुग्री व साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे १० कोटींची मागणी करण्यात आली असल्याचेही त्या म्हणाल्या. ग्रामीण भागात पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर तयार करणे, यात मनुष्यबळ, उपकरणे व औषधी, वाढीव बेड याबाबतचा प्रस्ताव पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठविला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- आदिवासी भागावर विशेष लक्ष
जिल्ह्यातील रामटके व पारशिवनी या आदिवासी भागात लसीकरणासाठी जि.प. चे अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत समुपदेशन व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात म्युकरमायकोसिस आजाराबाबत देखील जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात काेरोनाची तपासणी केंद्राची संख्या कमी आहे. हे केंद्र वाढविण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.