पर्यटनाला चालना देण्यासाठी विदर्भात कृषी पर्यटनावर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:00+5:302021-06-04T04:07:00+5:30

नागपूर : विदर्भातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कृषी पर्यटनावर भर देण्याची योजना पर्यटन विभागाकडून आखली जात आहे. विदर्भातील वन ...

Emphasis will be laid on agri-tourism in Vidarbha to boost tourism | पर्यटनाला चालना देण्यासाठी विदर्भात कृषी पर्यटनावर भर देणार

पर्यटनाला चालना देण्यासाठी विदर्भात कृषी पर्यटनावर भर देणार

Next

नागपूर : विदर्भातील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी कृषी पर्यटनावर भर देण्याची योजना पर्यटन विभागाकडून आखली जात आहे. विदर्भातील वन पर्यटन आणि कृषी पर्यटनाची सांगड घातल्यास येथील बेरोजगारीचा प्रश्न दूर होऊन शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचावेल, असा आशावाद नागपूर विभागाचे पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना संक्रमण दूर झाल्यावर पर्यटनाला वाव मिळण्यासंदर्भात काय आखणी आहे, यावर ‘लोकमत’शी बोलताना सवाई म्हणाले, पर्यटन वाढीसाठी लॉकडाऊन ही उत्तम संधी आहे. पूर्व विदर्भात जंगल हे पर्यटनाचे मुख्य स्त्रोत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागझिरा, बोर, पेंच, तोतलाडोह, नवेगाव या स्थळांचा बराच विकास झाल्याने पर्यटकांची पसंती असते. ही मानसिकता लक्षात घेऊन ॲग्रो टूरिझम विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिकांना ॲग्रो टूरिझमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना पर्यटनाच्या नव्या व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांचे आणि परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि पर्यटन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाची गंगाजळी वाढविणे हा यामागील हेतू आहे.

...

बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विकासावर यंदा भर

या वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्यावर अधिक भर राहणार आहे. हा व्याघ्र प्रकल्प म्हणावा तसा प्रसिद्ध नाही, त्यामुळे पर्यटकांची पसंती येथे कमी आहे. वर्धा आणि नागपूर या दोन जिल्ह्याच्या क्षेत्रावर या अभयारण्याचा भाग असून वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलूजवळील हिंगणी या गावाजवळ हा प्रकल्प आहे. या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी बराच वाव असल्याने त्यावर यंदा अधिक भर राहणार आहे. सोबतच लगतच्या भागात कृषी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

...

ॲग्रो टूरिझमसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

ॲग्रो टूरिझमकडे वळण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या व्यवसायाच्या उभारणीसाठी थेट अनुदानाची योजना आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये आठ खोल्यांचे बांधकाम करता येते. त्यासाठी परवानगीची गरज नाही. विद्युत विभागाकडूनही सवलत असून हे दर व्यावसायिक आकारणीनुसार राहणार नसतील. हा व्यवसाय करमुक्त असून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे वित्त सहाय्य देण्याची तरतूद आहे. पर्यटकांचा विश्वास आणि ओघ वाढावा यासाठी शासनाचा लोगो वापरण्याची परवानगी यात आहे.

...

योजना ऑक्टोबर-२०२० पासून लागू

ॲग्रो टूरिझम योजना ऑक्टोबर-२०२० पासून राज्यात लागू झाली आहे. या व्यवसायासाठी विदर्भातील २० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यात नागपूरच्या परिसरात ६ ते ७ शेतकरी आहेत. वर्धा येथे ५ तर गोंदियात २ युनिट उभारण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

...

Web Title: Emphasis will be laid on agri-tourism in Vidarbha to boost tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.