पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:49 PM2020-08-05T23:49:05+5:302020-08-05T23:50:18+5:30
शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्तांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची चाचणी करा, संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास होम आयसोलेशनमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करावे. याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक आहे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची दहा दिवस देखरेख आवश्यक आहे.
लक्षणे आढळल्यास संबंधितांनी शहरातील मनपाच्या २१ कोविड टेस्टिंग सेंटरपैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खासगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची माहिती मिळताच संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह रुग्णाच्या चाचणीबाबत आवश्यक कारवाई करावी.
तर खासगी रुग्णालयांवर कारवाई
७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढळल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या झोनमधील खासगी रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करून त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.