Coronavirus in Nagpur; प्रवेश परीक्षेसाठी ‘व्हर्च्युअल क्लासेस’वर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:45 AM2020-03-26T11:45:22+5:302020-03-26T11:47:11+5:30
प्रवेश परीक्षा काही आठवड्यातच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा स्थितीत ‘कोचिंग क्लासेस’कडून ‘व्हर्च्युअल क्लास’वर जास्त भर देण्यात येत आहे.
सय्यद मोबीन
नागपूर : उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे सर्व ‘कोचिंग क्लासेस’ बंद आहेत. प्रवेश परीक्षा काही आठवड्यातच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा स्थितीत ‘कोचिंग क्लासेस’कडून ‘व्हर्च्युअल क्लास’वर जास्त भर देण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करुन घेण्यात येत आहे.
राज्य पातळीवरील अभियांत्रिकी, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी ‘एमएचसीईटी’, राष्ट्रीय पातळीवर अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठी ‘जेईई’, वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ देणे अनिवार्य आहे. ‘व्हर्च्युअल क्लासेस’च्या माध्यमातून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
‘ऑडिओ-व्हिडीओ’च्या माध्यमातून धडे
शिक्षकांकडून संबंधित विषयांची ‘ऑडिओ’ व ‘व्हिडीओ क्लीप’काढून ती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे. त्यातूनच विद्यार्थी अभ्यास करत आहेत. जर काही समस्या असतील तर ते फोन किंवा ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क करत आहेत.
परीक्षेची मुदत वाढण्याची अपेक्षा
प्रवेश परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात येण्याची ‘कोचिंग क्लासेस’च्या संचालकांना अपेक्षा आहे. देशभरात ‘लॉकडाऊन’ असल्याने प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्याच लागणार आहेत. सध्याची जी स्थिती आहे त्याचा सामना सर्वांना मिळूनच करायचा आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात नुकसान होऊ नये याचीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने शिकविण्यात येत असल्याचे ‘कोचिंग क्लास’ संचालक मुस्तफा खान यांनी सांगितले.
‘मोबाईल अॅप’मुळे फायदा
काही ‘क्लासेस’ने ‘मोबाईल अॅप’ तयार केले आहेत. याचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना होत आहे. याचा उपयोग केवळ ‘क्लासेस’चे विद्यार्थीच करु शकत आहेत. ‘स्मार्ट फोन’च्या माध्यमातून ‘नोट्स’ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.