पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघातएक कर्मचारी जखमी : भिष्णूर परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 02:53 AM2016-05-24T02:53:52+5:302016-05-24T02:53:52+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पोलिसांचे भरधाव वाहन वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटले.
नरखेड : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पोलिसांचे भरधाव वाहन वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटले. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलफाटा ते नरखेड मार्गावरील भिष्णूर गावाजवळ सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
सरफराज अहमद शेख (ब.नं. १३०५०, नागपूर शहर पोलीस विभाग) असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. सरफराज शेख हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोलीस ताफ्यासोबत होते. चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी सकाळी नरखेड तालुक्यातील जामगाव (बु) येथे वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. येथे त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या अणि रोहणा येथे कार्यक्रमाला निघून गेले.
पालकमंत्र्यांना काटोल तालुक्यातील मसली, वंडली, कलंभा शिवारात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार उपक्रमातील कामांची पाहणी करावयाची होती. त्यामुळे रोहणा येथील कार्यक्रम आटोपताच हा ताफा बेलफाटा-भिष्णूर मार्गे मसलीकडे जायला निघाला.
दरम्यान, भिष्णूर गावालगत असलेल्या डोंगराच्या वळणावर एमएच-३१/एजी-९९१२ क्रमांकाच्या पोलीस वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला आणि सदर वाहन रोडच्या कडेला उलटले. या वाहनात बसलेल्या सहायक फौजदार दिवाकर तेलमोरे, सहायक फौजदार तिवारी, हेडकॉन्स्टेबल शेख आणि पोलीस शिपाई सफराज शेख यांच्यापैकी सरफराज शेख हे जखमी झाले. यात त्यांच्या उजवा हात व पायाला दुखापत झाली.
त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज करांडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन सरफराज शेख यांची भेट घेत चौकशी केली. (तालुका प्रतिनिधी)