कॉन्फिडन्स पेट्रोलियममध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:47 PM2020-10-12T22:47:46+5:302020-10-12T22:49:17+5:30
Employee Committed Suicide in Factory कळमेश्वर शहरालगतच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया प्रा. लि. नामक कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : शहरालगतच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया प्रा. लि. नामक कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
अमित नंदकुमार कवडे (३९, रा. येळाकेळी, ता. सेलू, जिल्हा वर्धा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. अमित काही वर्षांपासून या कंपनीत नोकरी करायचे. ते कळमेश्वर शहरातील वॉर्ड क्रमांक-१४ मध्ये कुटुंबीयांसह राहायचे. या कंपनीमध्ये घरगुती वापराच्या स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचे उत्पादन केले जाते. ते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर केले. त्यातच त्यांनी कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अमित यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यांच्या आत्महत्येला कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप वडील नंदकुमार यांनी केला आहे. मात्र, पोलीस दप्तरी या आरोपाची नोंद नाही.
कंपनीने लॉकडाऊन काळातही कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले आहे. अमितलाही नियमित वेतन सुरू होते. ते शांत स्वभावाचे व प्रामाणिक कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याची चौकशी करण्याच्या सूचना कंपनीच्या कार्मिक व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
शुभांक सिंग, कंपनी एक्झिक्युटिव्ह,
कॉन्फिडन्स ग्रुप.
या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्रकरण तपासात घेतले आहे. या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी केली जाईल. त्यात कुणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
मारुती मुळूक,
ठाणेदार, कळमेश्वर पोलीस ठाणे.