कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' संपेना; स्थायी समितीची बैठकही रद्द
By गणेश हुड | Published: November 18, 2023 02:59 PM2023-11-18T14:59:38+5:302023-11-18T15:02:56+5:30
दोन दिवसाची सुटी टाकून सलग नऊ दिवसाची दिवाळी
नागपूर : पाच दिवसाच्या सुट्यानंतर गुरुवारी शासकीय कार्यालये सुरु झाली. परंतु ती नावासाठीच, दोन दिवसानंतर शनिवार व रविवार आल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवारी सुटीचा अर्ज देत सलग नऊ दिवस दिवाळीचा आनंद लुटला. बहुसंख्य कार्यालयात शुकशुकाट असल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक रद्द करून पुढे ढकलावी लागली.
काही विभाग प्रमुख ड्युटीवर होते. मात्र त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची जबाबदारी असल्याने ते आले होते. यामुळे ते स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ग्रामीण भागातील विकास कामाच्या व गावातील अडीअडचणीवर मार्ग निघेल या आशेने नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात. स्थायी समितीच्या बैठकीतही महत्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. परंतु विभाग प्रमुखच उपस्थित नसल्याने जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांना बैठक रद्द करावी लागली.
जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयांना दिवाळीनिमित्त शनिवार आणि रविवार अशा जवळपास पाच दिवसांच्या सुट्या आल्या. गुरुवार (१६ नोव्हेंबर) पासून शासकीय कार्यालये पुन्हा सुरू झालीत. परंतु गुरुवार, शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवारला पुन्हा शासकीय सुटी आल्याने काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही या दोन दिवसांच्या सुट्या टाकून संपूर्ण आठवडाच वीकेंड म्हणून साजरा केला. शुक्रवारी शासकीय कायार्लयात शुटशुकाट होता. मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. आता सोमवारपासून कामकाज पूर्ववत होईल,अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.
शाळांना सुटी असल्याने पर्यटनाचा बेत
दिवाळी निमित्ताने शाळांना सुटी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाच दिवसाच्या सुटीनंतर गुरुवार व शुक्रवारची सुटी टाकून सलग नऊ दिवस दिवाळीचा आनंद लुटला. शाळांना सुटी असल्याने अनेकांनी कुटुंबियासह पर्यटनाला जाणे पसंत केले.