कामगार विमा रुग्णालय : आहारतज्ज्ञाला जुंपले निवडणुकीच्या कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:34 PM2019-09-24T22:34:37+5:302019-09-24T22:35:51+5:30

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील आहारतज्ज्ञालाच गेल्या १५ दिवसांपासून निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आले आहे.

Employees Insurance Hospital: Dietitian bound to election duty | कामगार विमा रुग्णालय : आहारतज्ज्ञाला जुंपले निवडणुकीच्या कामात

कामगार विमा रुग्णालय : आहारतज्ज्ञाला जुंपले निवडणुकीच्या कामात

Next
ठळक मुद्देरुग्णांच्या आहाराशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत आहाराची गरज असते. यासाठी आहारतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. परंतु कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील आहारतज्ज्ञालाच गेल्या १५ दिवसांपासून निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आले आहे. परिणामी, विना आहारतज्ज्ञ रुग्णांना आहार दिला जात आहे. विशेष म्हणजे, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना रुग्णालयबाह्य कामासाठी पाठविता येत नसल्याचा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सोमवारीपेठेतील या विमा रुग्णालयाशी तीन लाख कामगार जुळलेले आहेत. त्यांचे कुटुंब धरून सुमारे १२ लाख व्यक्तींच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशातून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून असलेला औषधांचा तुटवडा, मोजकेच डॉक्टर, आऊट सोर्सिंग केलेल्या चाचण्या यामुळे कामगार रुग्णांना दुसऱ्या इस्पितळात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. आता आहारतज्ज्ञही नसल्याने रुग्णांच्या आहारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच विमा रुग्णालयात पाकगृहाची सुरुवात झाली. २०० खाटांच्या या रुग्णालयात सध्याच्या स्थितीत ५० रुग्ण आहेत. त्याना सकाळच्या नाश्त्यासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यासह तो आहार आहार चाखून पाहिल्यावर व मंजुरी दिल्यावरच रुग्णाला आहार देण्याचा नियम आहे. परंतु विमा रुग्णालयात एकच आहारतज्ज्ञ असताना त्याच्याकडे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे काम सोपविण्यात आले. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून विना आहारतज्ज्ञ रुग्णांना जेवण दिले जात आहे. दुसरीकडे या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची १६२ पदे मंजूर असताना १०७ पदे रिक्त आहेत. केवळ ५५ कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांना दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसात निवडणुकीच्या कामाची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवरही येणार असल्याने रुग्णालयाचे काम प्रभावित होण्याची शक्यता आहे. विशेषत: कार्यालयीन कामाची जबाबदारी असलेले क्लर्क केवळ तीन असताना यातील एकाला नुकतेच निवडणुकीच्या कामात जुंपले आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मीना देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

 

Web Title: Employees Insurance Hospital: Dietitian bound to election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.