ताजाबाद ट्रस्टच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी पोहोचले ठाण्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:09+5:302021-08-23T04:11:09+5:30
नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या नव्या कार्यकारिणीची निवड होऊन काही महिनेच उलटून गेले आहेत. परंतु आतापासूनच अध्यक्ष प्यारे ...
नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या नव्या कार्यकारिणीची निवड होऊन काही महिनेच उलटून गेले आहेत. परंतु आतापासूनच अध्यक्ष प्यारे खानसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मनमानी करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देऊन नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सुरक्षा प्रभारी शहजादा खान यांना मनमानी पद्धतीने निलंबित करण्यात आल्यामुळे हा असंतोष आणखीनच वाढला आहे. रविवारी ट्रस्टमधील कर्मचारी सक्करदरा ठाण्यात गोळा झाले. पोलिसांना त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी मध्यस्थी करण्यावर भर दिला. परंतु कर्मचाऱ्यांनी कामाच्या नावाखाली आम्हाला त्रास देण्यात येत असल्याचे पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये ट्रस्टचे काळजीवाहू शहजादा खान यांच्या नावे न्यायालयातून निलंबनाचे पत्र जारी झाले होते. तेव्हा तत्कालीन प्रशासनाने न्यायालयासमोर त्याचे उत्तर देऊन त्यांचे निलंबन टाळले होते. सोबतच प्रशासनाने खान यांना काळजीवाहू पदावरून सुरक्षा प्रभारी पदाचा कार्यभार सोपविला होता. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत. परंतु सध्या ट्रस्टच्या वतीने त्यांना जुन्या निलंबनाच्या पत्राचे कारण देऊन नोटीस पाठविली आणि निलंबित केले. त्यामुळे खान यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते मनमानी पद्धतीने निलंबित करणे चुकीचे आहे. ट्रस्टच्या वतीने मनमानी पद्धतीने नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात येत आहे. सोबतच अनावश्यक काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनुसार कोरोनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोबतच ट्रस्टच्या अध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यही कर्मचाऱ्यांसोबत द्वेषपूर्ण व्यवहार करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.
..................