रिक्त पदे भरण्याचा अधिकार नियोक्त्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:43+5:302021-04-29T04:06:43+5:30
नागपूर : किती रिक्त पदे कोणत्या वेळी भरायची, हा अधिकार नियोक्त्याचा आहे़ नियोक्त्याला यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यास बाध्य करणारा ...
नागपूर : किती रिक्त पदे कोणत्या वेळी भरायची, हा अधिकार नियोक्त्याचा आहे़ नियोक्त्याला यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यास बाध्य करणारा कायदा व धोरण अस्तित्वात नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात स्पष्ट करून तातडीने अनुकंपा नोकरीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली़
न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी संबंधित प्रकरणावर निर्णय दिला़ अकोला येथील वर्षा आखरे यांनी ही याचिका दाखल केली होती़ त्या २५ एप्रिल २०२१ रोजी वयाची ४५ वर्षे पूर्ण करणार होत्या़ त्यामुळे अकोला महानगरपालिका येथे या तारखेपूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे होते़ राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये क व ड श्रेणीची ८०१ पदे रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली होती़ परंतु, यासंदर्भात कायदा व धोरण आढळून न आल्यामुळे न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला़ किती रिक्त पदे कोणत्या वेळी भरायची हा नियोक्त्याचा अधिकार आहे़ रिक्त पदे भरताना नियोक्त्याला विविध पैलू विचारात घ्यावे लागतात़ त्यामुळे पदे रिक्त असली तरी, एखाद्या उमेदवाराला तातडीने नियुक्ती देण्याचे निर्देश नियोक्त्याला देता येणार नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले़