देशात पर्यावरण क्षेत्रात रोजगारसंधी : नागपुरात देशभरातील तज्ज्ञांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:26 PM2019-03-14T21:26:38+5:302019-03-14T21:27:41+5:30
‘सीएसआयआर-नीरी’ येथे गुरुवारी ‘ग्रीन जॉब्स’संदर्भात मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला देशातील विविध संस्थांमधील तज्ज्ञांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे मुद्दे विविध पातळ्यांवर गंभीरतेने घेण्यात येत आहे. देशात पर्यावरण व निगडित क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यासंदर्भात जागृती निर्माण व्हायला हवी, असा मान्यवरांचा सूर होता. देशातील ‘ग्रीन जॉब्स’ क्षमतेबाबत चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीएसआयआर-नीरी’ येथे गुरुवारी ‘ग्रीन जॉब्स’संदर्भात मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला देशातील विविध संस्थांमधील तज्ज्ञांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे मुद्दे विविध पातळ्यांवर गंभीरतेने घेण्यात येत आहे. देशात पर्यावरण व निगडित क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यासंदर्भात जागृती निर्माण व्हायला हवी, असा मान्यवरांचा सूर होता. देशातील ‘ग्रीन जॉब्स’ क्षमतेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे, प्रधान वैज्ञानिक डॉ.प्रदीप साळवे, डॉ.एच.व्ही.सिंह, वैज्ञानिक डॉ.सुव्हा लामा हे उपस्थित होते. ‘एससीजीजे’च्या (स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स) ‘असेसमेंट अॅन्ड अॅशुरन्स’ विभागाचे प्रमुख अर्पित शर्मा, दिल्ली येथील ‘इको इंच प्रा.लि.’चे चेअरमन डॉ.अनुपम जैन, वडोदरा येथील ‘वडोदरा एनव्हायरो चॅनल लि.’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश पांचाल, ‘एसएमएस एन्व्होकेअर’चे किशोर मालविया हेदेखील उपस्थित होते. ‘एससीजीजे’ने सांडपाणी प्रक्रियेतील कौशल्य विकासाकडे जास्त भर दिलेला नाही. मात्र यासंदर्भात तांत्रिक मदतीसाठी ‘नीरी’चे सहकार्य घेण्यात येईल, असे अर्पित शर्मा यांनी सांगितले. ‘ग्रीन जॉब्स’शी निगडित कौशल्याचा देशात अभाव दिसून येतो. विशेषत: हवामान बदलासारख्या क्षेत्रात हे प्रमाण जास्त जाणवते. ‘एनर्जी आॅडिटिंग’ आणि ‘कॉम्प्युटर सिम्युलेशन स्किल्स’ यांना येत्या काळात प्रचंड महत्त्व येणार असल्याचे प्रतिपादन डॉ.अनुपम जैन यांनी केले.
यावेळी सतीश पांचाल यांनी सांडपाणी प्रक्रियेशी संबंधित रोजगार संधींवर प्रकाश टाकला. कचऱ्याच्या वाहतुकीसाठी व त्याला हाताळण्यासाठी प्रशिक्षित चालक व मदतनीसांची जास्त आवश्यकता असून त्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला डॉ.किशोर मालविया यांनी दिला. यावेळी मुंबई येथील अणुऊर्जा नियामक मंडळाचे डॉ.एस.के.दुबे यांनी अणुऊर्जा उद्योगातील कौशल्य विकासावर भाष्य केले.
सोबतच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत यांनी ‘नीरी’ने विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम चालवावे असे सांगितले. ‘टेस्ला इनोव्हेशन प्रा.लि.’चे संचालक प्रशांत अडसूळ यांनी पर्यावरण क्षेत्राशी निगडित उद्योगक्षेत्रांतील आवश्यकतांबाबत माहिती दिली. आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष अर्शद तनवीर खान यांनीदेखील यावेळी विविध अभ्यासक्रमांबाबत माहिती दिली.
तत्पूर्वी डॉ.राकेश कुमार यांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी व सुसंगत असावेत असे मत व्यक्त केले. डॉ.जे.एस.पांडे यांनी आयोजनाबाबत माहिती दिली. प्रकाश कुंभारे यांनी ‘नीरी’तील विविध कौशल्य विकास उपक्रमांवर प्रकाश टाकला.